सैन्य भरतीच्या आमिषाने चौघांना साडेआठ लाखांचा गंडा
By admin | Published: February 13, 2015 01:09 AM2015-02-13T01:09:17+5:302015-02-13T01:14:40+5:30
गडहिंग्लज तालुक्यातील घटना
गडहिंग्लज : सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवून चौघा युवकांकडून साडेआठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी श्रीराम गणपत यादव (सध्या रा. माजी सैनिकनगर, विश्रांतीवाडी, पुणे, मूळ गाव - आंबिवली, ता. खेड, जि. रत्नागिरी) या भामट्याविरोधात गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
कलगोंडा शिवगोंडा पाटील (रा. गडहिंग्लज), अमर बसाप्पा चितारे आणि स्वप्निल पाटील (रा. नूल) व शेखर मल्लाप्पा औरगोळे (रा. हसूरचंपू) अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांतील माहितीनुसार, कलगोंडा हा २००९ मध्ये बेळगाव येथे सैन्य भरतीसाठी गेला असता त्याची वरील संशयिताशी ओळख झाली. आपण निवृत्त सैन्य अधिकारी असल्याचे सांगून यादव याने माझ्या ओळखीने भरती करतो, असे सांगत प्रत्येकी चार लाखांची मागणी केली. त्यापैकी दोनवेळा गडहिंग्लज येथे प्रत्यक्ष येऊन त्याने शिवगोंडा पाटील यांच्याकडून लाख रुपये घेतले. नंतर त्याच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर चार लाख ४५ हजार जमा करण्यास सांगितले.
जानेवारी २०१० मध्ये पैसे घेऊनही भरतीबाबत विचारणा केली असता यादव हा टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर कलगोंडा यांचे वडील शिवगोंडा पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली.