उद्यापासून सैन्यभरती
By admin | Published: February 2, 2016 01:01 AM2016-02-02T01:01:31+5:302016-02-02T01:01:31+5:30
सुभाष सासने : तालुकानिहाय प्रक्रिया; ५७ हजार जणांची नोंदणी
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहा व गोव्यांतील दोन जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांसाठी कोल्हापुरात उद्या, बुधवारपासून सैन्यदलातील विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. सैन्यभरती कार्यालयाने या प्रक्रियेचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात २० फेब्रुवारीपर्यंत भरतीची प्रक्रिया चालणार आहे. यासाठी सुमारे ५७ हजार जण उपस्थित राहतील.
गोंधळ होऊ नये तसेच उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी यावेळी पहिल्यांदाच तालुकानिहाय भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरती प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी दिली.
मेजर सासने म्हणाले, भरती प्रक्रियेचे नियोजन जिल्हा सैनिक कार्यालय व सैन्यभरती कार्यालयातर्फे केले आहे. सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर क्लार्क, स्टोअरकिपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, सोल्जर ट्रेडस्मन पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी १९ जानेवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यातील सुमारे ५७ हजार पात्र उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होतील. त्यात प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल. या कार्डवर नमूद केल्यादिवशी आणि वेळेत भरतीसाठी प्रवेशपत्राच्या प्रिंटसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. उद्या, बुधवारपासून भरतीची प्रक्रिया सुरू होईल. यासाठीची वजन, उंची आणि कागदपत्रांच्या तपासणीची प्रक्रिया आज, मंगळवारी रात्री बारापासून सुरू होईल. सकाळी पाच वाजता पहिली बॅच धावण्याच्या प्रक्रियेत सहभागी होईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. या प्रक्रियेसाठी शिवाजी विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आदींचे सहकार्य मिळाले आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना जीवनमुक्ती संस्था व व्हाईट आर्मीतर्फे विनामूल्य जेवण दिले जाणार आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेसाठी तंबू उभारणी, बॅरेकेटस् लावणे, विजेची सुविधा आदी कामकाज सोमवारी सुरू होते.