अत्तराचा सुगंध ‘लाख’मोलाचा..वनस्पतीपासून तयार होतात

By Admin | Published: September 14, 2014 10:41 PM2014-09-14T22:41:06+5:302014-09-14T23:56:26+5:30

प्राचीन काळापासून वापर : मन आल्हाददायक, प्रसन्न करण्यासाठी स्त्री-पुरुषांकडून आवर्जून वापर; सुगंधी द्रव्ये,

The aroma of the scent of 'lakhs' is prepared from the plant | अत्तराचा सुगंध ‘लाख’मोलाचा..वनस्पतीपासून तयार होतात

अत्तराचा सुगंध ‘लाख’मोलाचा..वनस्पतीपासून तयार होतात

googlenewsNext

सचिन भोसले -कोल्हापूर -मनुष्याचे मन आल्हाददायक व प्रसन्न करण्यासाठी फार प्राचीन काळापासून सुगंधी द्रव्य (अत्तर) वापरले जाते. अर्थात हा वापर सुगंधी द्रव्ये व वनस्पतीजन्य पदार्थांच्या तेल व अर्कांपासून तयार केलेल्या पदार्थांपासून होत आहे.
पूर्वी केवळ सण-समारंभाकरिता सुगंधी द्रव्य अर्थात अत्तर हाताच्या मनगटावर व मानेवर लावले जात होते. जेणेकरून मन प्रसन्न व्हावे आणि कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित व्हावा हा यामागील उद्देश होता. मात्र, सध्या अत्तर, बॉडी स्प्रे, रासायनिक परफ्यूम, हेअर स्प्रे, रूम फ्रेशनर रोजच्या जीवनातील घटक बनला आहे. रोज अंघोळीनंतर दिवसभर फ्रेश राहण्यासाठी अत्तरांच्या प्रकारांचा वापर केला जातो. कोल्हापुरात या अत्तर, सेंट, बॉडी स्प्रे, कार स्प्रे, हेअर स्प्रे, रूम फ्रेशनर यांची मोठी बाजारपेठच निर्माण झाली आहे. याची रोजची उलाढाल दोन ते अडीच लाख रुपये इतकी आहे. अशा या सुगंधीत अत्तरांबद्दलची माहिती व अत्तर आणि सेंट यामधील फरक जाणून घेऊ ‘लोकमत’संगे.
अत्तर याला काही ठिकाणी ‘ईत्तर’ असेही म्हटले जाते. अत्तर हे सुगंधी वनस्पतींच्या विविध भागांपासून जसे खोड, फूल यांचा उकळून अर्क काढून त्यापासून तेल तयार केले जाते. त्यांच्या विविध सुवासानुसार ही अत्तरे एक वर्षापासून जास्तीत जास्त दहा वर्षांपर्यंत टिकवून ठेवली जातात. अत्तर हे कमी प्रमाणात झाडांपासून मिळतात. त्यामुळे त्यांचे बाजारातील मूल्य अधिक असते.
सर्वांत प्रथम अत्तराचा वापर मुघल साम्राज्यापासून केल्याचा इतिहासात उल्लेख आहे. निजामशाहीतील लोक हैदराबादमधील ‘जास्मिन’ अत्तराचे शौकीन होते. पूर्वी पाहुण्यांना निरोप देताना अत्तर भेट म्हणून दिले जात असे. ही अत्तरे काचेच्या रंगीत चकाकणाऱ्या छोट्या बाटल्यांमधून दिली जात होती. या बाटल्यांनाच ‘अत्तरदाणी’ असेही म्हटले जायचे. मुस्लिम समाजातही अत्तर पवित्र भेट देतात तसेच स्त्री-पुरुषांमध्ये अत्तराचा वापर आवर्जून केला जातो.

अत्तराला अरेबिक भाषेत ‘सेंट’ असेही म्हटले जाते. ‘अत्तर’ या शब्दाचा अर्थ सुवास असा आहे. भारतात काही हजार वर्षांपासून अत्तर तयार तसेच वापरले जाते. पूर्वी अत्तरांचा शोध त्या-त्या ऋतूनुसार, त्या-त्या फुलांपासून व फळांपासून अत्तर मिळविले जात होते. संस्कृत साहित्यामध्ये अत्तराचा उल्लेख आहे. त्यामध्ये ‘गंधयुक्ती’मधून अत्तर तयार करण्याची प्रक्रियाच सांगितली आहे. जसे ‘रोघरा’, ‘उसियरा’, ‘बिगोनिया’, ‘अगुरू’, ‘मुस्ता’, ‘वण’, ‘प्रियांगु’ व ‘पथ्या’ अशी मुखवासाची अत्तरे, अंघोळीसाठीची अत्तरे, पावडर केली जातात.

फुलांपासून बनविली जातात अत्तरे
‘गुलाब’, ‘मोतीया’, ‘जास्मिन’, ‘केवडा’, ‘केशबू’, ‘गुलहिना’, ‘गेंदा’, ‘मेरिगोल्ड’, ‘चंपा’, ‘बकुळ’, ‘ब्ल्यू लोटस’, ‘पिंक लोटस’ (कमळ), ‘व्युबरॉस’, ‘रजनीगंधा’, ‘लिली’, ‘जफारी’, ‘चमेली’, ‘गुलमोहर जुही’, ‘बखर’, ‘मोगरा’, ‘नखछोया’ या फुलांपासून अत्तरे बनविली जातात.

अत्तर व सेंटमधील फरक
अत्तर हे फुलांच्या, वनस्पतींच्या तेलांपासून बनविले जाते. ते अल्कोलरहित असल्याकारणाने त्याचा वापर शरीरावर थेटरीत्या केला जातो. त्यामध्ये हाताच्या मनगटावर, मानेवर, काखेत केला जातो. त्याचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. याउलट सेंट जे अल्कोल वापरून व रासायनिक पदार्थ वापरून करतात. सेंटच्या तुलनेत अत्तर हे अत्यल्प प्रमाणात वापरतात. कारण अत्तराचा वास उग्र असतो. सेंट कपड्यांवर मारतात, तर अत्तर हाताच्या मनगटावर, मानेवर लावले जाते. बॉडी स्प्रे थेट शरीरावर मारली जातात.

प्राचीन काळात भारतात अत्तर केवळ राजे-महाराजेच वापरत होते. याशिवाय देवळांमध्येही अत्तराचा वापर केला जात होता. मात्र, बदलत्या काळानुसार रोजच्या धकाधकीच्या जीवनात शरीरामधून घाम मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो. त्यामुळे अंगाला एकप्रकारे दुर्गंधी येते. ही दुर्गंधी लपविण्यासाठी अत्तरांचा वापर केला जातो. तसेच पानमसाल्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अत्तर हे अल्कोलरहित असल्याने मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात वापरतात. औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांनाही आपल्या औषधांचा कडू वास घालविण्यासाठी अत्तराचा वापर करावा लागतो. देवाला दिल्या जाणाऱ्या प्रसादाकरिताही ‘गुलाब’, ‘केवडा’ या दोन अत्तरांचा वापर आजही केला जातो. त्याचबरोबर गणेशोत्सव व दसरा या दोन सणांत देवाला अत्तराचा फाया दिला जातो.

मिट्टी अत्तर - नदीच्या पात्रातील मातीपासून तयार केले जाते, तर अगारवूड (ऊद), शाहमना, अंबर हे अत्तर झाडांच्या विविध भागांपासून तयार केले जाते, तर खस हे अत्तर मुळापासून व लोबन हे अत्तर झाडाच्या विविध भागांपासून तयार केले जाते. दवना, कस्तुरी हे पानांपासून तयार केले जाते.

आयुर्वेदिक पद्धतीची अत्तरे : फळ, फूल, पान, खोड, मसाले, आदी भागांपासून काही अत्तरे तयार केली जातात. यामध्ये हिना, मस्क, अंबर आदींचा समावेश होतो.

गरम अत्तरे : ‘मस्क’, ‘अंबर’, ‘केशर’, ‘उद’ ही अत्तरे थंडीच्या काळात वापरली जातात. जेणेकरून शरीराचे तापमान संतुलित राहावे.
थंड अत्तरे : ‘गुलाब’, ‘जास्मिन’, ‘केवडा’, ‘खस’, ‘मोगरा’ ही अत्तरे उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी वापरतात.

आजच्या धावपळीच्या युगात दिवसभर घामाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी परफ्यूम, सेंट, अत्तर, बॉडी स्प्रे यांचा वापर अनिवार्य होत आहे. महिन्याच्या बजेटमध्ये अत्तरांच्या प्रकारांसाठी वेगळे बजेट काढले जाते. रोजची गरज म्हणून गिऱ्हाईक या वस्तू खरेदी करतात. - शीतल पाटील, अत्तर व्यावसायिक

Web Title: The aroma of the scent of 'lakhs' is prepared from the plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.