Women's Day Special: कोल्हापुरातील ‘त्या’ चौघी पॉकेटमनीतून देताहेत समाजसेवेचे धडे
By संदीप आडनाईक | Updated: March 8, 2025 15:19 IST2025-03-08T15:19:12+5:302025-03-08T15:19:39+5:30
आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रस्ता सुरक्षा, सामुदायिक सेवा विषयांवर समाजकार्य

Women's Day Special: कोल्हापुरातील ‘त्या’ चौघी पॉकेटमनीतून देताहेत समाजसेवेचे धडे
संदीप आडनाईक
कोल्हापूर : आपल्या अवतीभवती अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे अनेकांना वाटत असते. परंतु समाजकार्याचे शिवधनुष्य हाती घेणे सोपे नाही. आपण काही सुपरहिरो नाही आहोत याची जाणीव असलेल्या कोल्हापुरातील चारचाैघींनी खारीचा वाटा देत स्वत:च्या पॉकेटमनीतून पाच विषयांवर प्रत्यक्ष समाजकार्यास सुरुवात केली. त्यांच्या कामामुळे आज त्या समाजाच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत.
अर्पिता दत्तात्रय राऊत, श्रुती प्रमोद चौगुले, श्रेया प्रमोद चौगुले, आंचल विनोद कटियारी या चौघी त्या बालमैत्रिणी. श्रेया आणि आंचल अजून शिक्षण घेत आहेत. चौघीही विशीपंचविशीच्या. कोविडच्या काळात रुग्णांची स्थिती पाहून त्यांनी रुग्ण आणि नातेवाइकांना नाश्ता देण्याचा निर्णय घेतला. खाऊच्या पैशातून त्यांनी ६५ दिवस न कंटाळता हा उपक्रम तडीस नेला.
मे २०२१ मध्ये डॉ. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनची स्थापना केली. आता त्या आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रस्ता सुरक्षा आणि सामुदायिक सेवा या विषयाच्या मर्यादेत काम करताहेत. त्यांची १५० जणांची टीम कार्यरत आहे.
आरोग्य
- १ रुपयात १ लिटर गरम तसेच नियमित पाणी पुरवणारे सीपीआरमध्ये वॉटर एटीएम
- १००० जणांना एनर्जी ड्रिंकचे वाटप
- ६०० हून अधिक जणींना सॅनिटरी पॅडचे वितरण
रस्ता सुरक्षा :
- ६ ठिकाणी ९० अंश कोनातील कॉनव्हेक्स मिरर बसवले (बहिर्वक्र आरसे)
- १८ ठिकाणी आरसे बसवण्याचे नियोजन
- १५० स्वयंसेवक वाहतूक नियंत्रण आणि जनजागृतीसाठी सज्ज
शिक्षण क्षेत्र :
- ६०० पुस्तकांचा समावेश असलेल्या ग्रंथालयाची गिरगावच्या शाळेत निर्मिती
- ३० ठिकाणच्या झोपडपट्टी, वीटभट्टी, बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य
- ३ शाळांमधील मुलींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा
- ३० जणांच्या कार्यशाळेतून बालविकास शिबिर
पर्यावरण रक्षणाचे काम
- २५० हून अधिक रोपांची लागवड
- २५०० प्लास्टिक बॅग्ज केल्या गोळा
- २००० ठिकाणी प्लास्टिकला पर्याय म्हणून कॉटन बॅग्जचे वितरण
- ३०० पेपर बॅग्जची कार्यशाळेतून निर्मिती
- १२ ठिकाणी रंकाळ्याच्या परिसरात मोठ्या बॅगेत कचरा साठवण्याची व्यवस्था
- ५० डस्टबीन उभारण्याचे नियोजन
सामुदायिक सेवा :
- श्रमिक, वीटभट्टी आणि बांधकाम कामगार तसेच झोपडपट्टीतील लोकांसाठी दरवर्षी कपडे, भाजीपाला, मिठाईचे वाटप
- रस्त्यावर झोपलेल्यांसाठी पांघरुण, ब्लँकेट्सचे वाटप