धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2016 12:19 AM2016-10-08T00:19:09+5:302016-10-08T00:36:56+5:30

राम शिंदे : आरेवाडीत दसरा मेळावा; राज्य सरकारकडून कायदेशीर बाबींची तपासणी

Arranged for the reservation of Dhangar community | धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कटिबद्ध

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कटिबद्ध

Next

ढालगाव : धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी दिले.
धनगर समाजाचा पहिला दसरा मेळावा आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शिंदे बोलत होते. ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, मेळाव्याचे निमंत्रक गोपीचंद पडळकर प्रमुख उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने धनगर समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द सरकार नक्कीच पूर्ण करणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. दसरा मेळाव्यानिमित्त येथे जमलेल्या या पिवळ्या वादळाची दखल सरकारला घ्यावी लागणार आहे. समाजाला चांगली दिशा मिळावी, यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. आपल्याला मिळालेल्या पदाचा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वापर करण्याबरोबरच, समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री बिरोबा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून देऊ.
आमदार देशमुख म्हणाले की, सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षण देण्याचा ठराव घेण्याचे आश्वासन भाजपने दिले होते, परंतु आजपर्यंत त्यावर कार्यवाही झालेली नाही. झोपेचे सोंग घेणाऱ्या राज्य शासनाला आजच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यामुळे जाग येईल. प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून द्यावी. महाराष्ट्रात ‘धनगर’ हीच जमात आहे, ‘धनगड’ नाही. शासनकर्ते अशा शब्दांचा आधार घेऊन धनगर समाजाला खेळवत आहेत.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, धनगर समाजाला विद्यमान सरकारकडून अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित मिळणार आहे. प्रस्थापितांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन धनगर समाजाला आरक्षण मिळू दिले नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा येतो, तेव्हा शरद पवार आदिवासी नेत्यांना भडकावतात. आम्हाला बारामतीच्या पवारांपेक्षा नागपूरचे देवेंद्र फडणवीस जवळचे आहेत. ते लवकरच मार्ग काढतील.
आरेवाडीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, बिरोबा देवस्थान विकासाचा आराखडा मंजूर करणे यासाठी पक्षभेद, गट-तट सोडून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज पडळकर यांनी व्यक्त केली.
प्रकाश शेंडगे म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार टाळाटाळ करीत आहे. यासंदर्भात सर्वेक्षणासाठी नेमलेल्या टाटा इन्स्टिट्यूटची प्रश्नावली म्हणजे समाजबांधवांची क्रूर चेष्टा आहे.
श्री बिरोबा देवस्थानच्या कामासाठीचा साडेबारा कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी देवस्थान जीर्णोध्दार समितीचे कार्याध्यक्ष जयसिंग शेंडगे यांनी केली.
यावेळी वीरशैव कक्कय्या समाजाचे सुरेश कांबळे, महादेव गडदे, चांदापूर कारखान्याचे अध्यक्ष उत्तम जानकर, सुरेश घागरे, बंडू डोंबाळे, मारूती सरगर आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या पल्लवी मेंढे, श्रीकांत पाटील, कृष्णात पिंगळे, डॉ. सतीश कोळेकर आदीसह विविध क्षेत्रात नाव मिळविलेल्या गुणवतांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण करून मेळाव्याची सुरुवात झाली. यावेळी चंद्रकांत हाक्के, आकाराम मासाळ, दादासाहेब कोळेकर, मिलिंद कोरे, अनिल लोंढे, शशिकांत पवार, शशिकांत बजबळे, राजू पाटोळे, भोजलिंग बंडगर, जगन्नाथ कोळेकर, रावसाहेब कोळेक र, रामचंद्र पाटील, मनोज कोळेकर, गजेंद्र कोळेकर, राजाराम पाटील आदीसह हजारोंच्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)


नेत्यांऐवजी महापुरुषांच्या प्रतिमा
श्री बिरोबा देवासमोर झालेल्या या मेळाव्यामधील प्रमुख व्यासपीठावर नेत्यांऐवजी थोर महापुरुषांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या, तर वक्त्यांसाठी उभारलेल्या दुसऱ्या व्यासपीठावर छत नसल्याने अनेक नेत्यांना उन्हातच उभे राहून बोलावे लागले. या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या हजारो धनगर बांधवांनी सकाळी अकरापासून दुपारी तीनपर्यंत भर उन्हात उपस्थिती कायम ठेवली.


मेळाव्यातील मागण्या आणि ठराव...
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे.
गेल्या पंधरा वर्षात धनगर समाजाला मंत्रीपद मिळाले नव्हते. त्यामुळे मंत्रिमंडळात धनगर समाजाला स्थान दिल्याबद्दल भाजप सरकारचे अभिनंदन
उरी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली व सर्जिकल आॅपरेशन यशस्वी केल्याबद्दल भारतीय जवानांचे अभिनंदन
अहमदनगर जिल्ह्याला ‘अहिल्यानगर’ नाव द्या
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या
हा दसरा मेळावा पहिला असला तरी, यापुढे दरवर्षी दसऱ्याच्या सातव्या दिवशी मेळावा होणार : गोपीचंद पडळकर

फडणवीस, पवारांवर टीका
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी, कॉँगे्रस व भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. प्रमुख वक्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

Web Title: Arranged for the reservation of Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.