शित्तूर-वारुण आरोग्यवर्धिनी केंद्रात २५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:58+5:302021-07-15T04:17:58+5:30
शित्तूर-वारुण: ...
शित्तूर-वारुण: शाहुवाडी तालुक्याच्या उत्तरेकडील दुर्गम भागात असलेल्या शित्तूर-वारुण आरोग्यवर्धिनी केंद्रात शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती विजय खोत यांच्या पुढाकाराने २५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत हे ऑक्सिजन बेड रुग्णांसाठी मोलाचा आधार ठरणार आहेत.
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील डोंगर-कपारीत वसलेली तेरा गावे व वाड्या-वस्त्या या आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यकक्षेत येतात.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत परिसरातील कित्येकजणांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हता. गोरगरीब रुग्णांची यामुळे कमालीची गैरसोय व आर्थिक ओढाताण होत होती.
ती दूर व्हावी व या डोंगर-दऱ्यांतील रुग्ण ऑक्सिजनअभावी दगावू नये. यासाठी सभापती विजय खोत यांनी आपल्या फंडातून या आरोग्य केंद्रात ऑक्सिजन पाईपलाईनसाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली. हे काम सध्या पूर्ण झाले असून काही दिवसांतच ते कोरोना रुग्णांच्या सेवेत येईल. मात्र या आरोग्य केंद्रात कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने तो ही त्वरित वाढविण्याची गरज आहे.
चौकट-
या आरोग्य केंद्रात ज्या ठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्याच बाजूला ऑपरेशन थिएटर असल्यामुळे कोविड केंद्र सुरू केल्यानंतर नगण्य संख्या असलेल्या प्रसूती रुग्णांना भेडसगाव किंवा ग्रामीण रुग्णालय मलकापूर या ठिकाणी पाठवावे लागणार आहे.
कोट
- आरोग्य वर्धिनी केंद्रात सध्या रिक्त असलेली पदे
सध्या आरोग्य केंद्रात केवळ १२ पदे कार्यरत आहेत. उर्वरित औषधे निर्माता ०१, आरोग्य सेविका एकूण ३ त्यापैकी मुख्यालय १ व उपकेंद्र २, शिपाई स्त्री १, एलएचव्ही १, जीएनएम २ याशिवाय उपकेंद्रातील ४ कंत्राटी आरोग्य सेविकांची अशी एकूण ११ पदे रिक्त आहेत.
विजय खोत (सभापती-पंचायत समिती शाहूवाडी)
या परिसरातील गोरगरीब, सर्वसामान्य लोकांची ऑक्सिजन बेडसाठी होणारी फरपट कायमसाठी थांबावी. यासाठीच हे काम करण्यात आले आहे. लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात. यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार आहे.
डॉ. एच. आर. निरंकारी (तालुका वैद्यकीय अधिकारी)
ऑक्सिजन बेडचे काम पूर्णत्वास आले असून अवघ्या दोनच दिवसांमध्ये येथे कोविड केंद्र सुरू करण्यात येईल. सध्या मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारीवर्गच कोविड केंद्रात कार्यरत राहिल.