बुद्धभूषण प्रेस पाडणाऱ्यांना अटक करा--‘भारिप’चे ‘चप्पल मारो’ आंदोलन
By admin | Published: June 30, 2016 12:31 AM2016-06-30T00:31:30+5:302016-06-30T01:10:14+5:30
लोकशाही डावी आघाडीतर्फे निदर्शने : शिवाजी चौक घोषणांनी दणाणला ‘भारिप’चे ‘चप्पल मारो’ आंदोलन बुद्धभूषण प्रेस प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी
कोल्हापूर : मुंबई येथील ऐतिहासिक आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस शासनाच्या मदतीने ट्रस्टींनी एका रात्रीत पाडला. याप्रकरणी या वास्तू पाडणाऱ्या दोषी विश्वस्तांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी बुधवारी सायंकाळी शिवाजी चौक येथे कोल्हापुरातील लोकशाही डावी आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
आंदोलकांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही जागा ४५ हजार रुपयांना विकत घेतली होती. या ठिकाणी बुद्धभूषण प्रेस त्या काळापासून उभारण्यात आली. या ठिकाणी बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत ही नियतकालिके छापली होती. यासह बाबासाहेबांच्या पुस्तिका, पत्रे, जुने अंक, बैठकांची परिपत्रके व इतिवृत्ते, आदी ऐतिहासिक दस्तऐवज होता. तो या विश्वस्तांनी चोरून नेला आहे. ही जागा चळवळीचे केंद्र होते. ते नष्ट करून त्याचा व्यावसायिक वापर करण्यासाठी महापालिकेने त्यांना विनाचौकशी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षात शासन इंदू मिलची जागा, लंडन येथील वास्तव्याची जागा स्मारकासाठी घेत आहे. जपानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येत आहे. अशा वेळी भारतातील बुद्धभूषण प्रेस व चळवळीचे केंद्र उद्ध्वस्त होत आहे. याचा डावी लोकशाही आघाडी निषेध करीत आहे. खासदार बाळासाहेब आंबेडकर यांनी याबाबतची तक्रार देऊनही पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नाही. तरी विश्वस्तांना तत्काळ अटक करावी. याकरिता डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने शिवाजी चौक येथे जोरदार निदर्शने केली.
यावेळी अनिल चव्हाण, सुभाष देसाई, नामदेव गावडे, शिवाजीराव परुळेकर, सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे, बी. एल. बरगे, आशा कुकडे, सुनीता अमृतसागर, आशा बरगे, गणी आजरेकर, मीना चव्हाण, दिलदार मुजावर, इर्शाद फरास,
संभाजी कागलकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘भारिप’चे ‘चप्पल मारो’ आंदोलन
बुद्धभूषण प्रेस प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी
कोल्हापूर : मुंबईतील आंबेडकर भवनसह बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस उद्ध्वस्त करण्याला रत्नाकर गायकवाड यांना जबाबदार धरुन भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेस ‘चप्पल मारो’ आंदोलन केले. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलकांकी रत्नाकर गायकवाड यांच्यासह त्यांच्यासोबत असणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. गायकवाड यांच्या प्रतिमेस ‘चप्पल मारो’ आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदविला. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना मागण्यांचे निवेदनदिले.
शनिवारी (दि. २५) पहाटे तीन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या जागेवरून बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस काढून प्रबुद्ध भारत, मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारखी वर्तमानपत्रे चालवून समाजामध्ये जागृती केली, ती प्रेस व भारतातील चळवळीचे केंद्रबिंदू असणारे आंबेडकर भवनच रत्नाकर गायकवाड, श्रीकांत गवारे यांनी ५०० ते ६०० गुंडांद्वारे बुलडोझर लावून उद्ध्वस्त केले. आंबेडकर भवन व त्या ठिकाणी असणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या काळातील ऐतिहासिक वास्तू व बहिष्कृत भारत, मूकनायक, प्रबुद्ध भारतचे अंक चोरून नेले. तसेच डॉ. आंबेडकरांच्या लढ्यातील महत्त्वाचे दस्तऐवज व ‘बहिष्कृत भारत’चे दुर्मीळ अंक, आंबेडकरांची जुनी तिजोरी अशा अमूल्य वस्तू या भवन पाडणाऱ्यांनी लुटून नेल्या आहेत. हा एकप्रकारे दरोडा टाकून आंबेडकरांची चळवळ नष्ट करण्याचा डावच या मंडळींची आखल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधितांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आंदोलनात शहराध्यक्ष संजय गुदगे, सुभाष कापसे, रमेश कामत, प्रशांत वाघमारे, प्रिया कांबळे,
विमल पोखरणीकर, हरी कांबळे, संभाजी कागलकर, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)