जतचा फौजदार लाच घेताना अटकेत

By admin | Published: April 3, 2016 03:49 AM2016-04-03T03:49:46+5:302016-04-03T03:49:46+5:30

तपासकामात सहकार्यासाठी

The arrest of a fugitive bribe | जतचा फौजदार लाच घेताना अटकेत

जतचा फौजदार लाच घेताना अटकेत

Next

जत : तपासकामात सहकार्यासाठी गुन्ह्यातील संशयिताकडे ५० हजारांची मागणी करून त्यातील दहा हजार रुपये स्वीकारत असताना येथील सहायक पोलिस निरीक्षकाला शनिवारी जत पोलिस ठाण्यातच अटक करण्यात आली. रफिकअहमद इमाम शेख (वय ५७, सध्या रा. विद्यानगर, जत, कायम रा. प्लॉट नं. ४ व ९, स्टार मंझिल, हुडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबत किसन टेंगले (२२, रा. कोसारी, ता. जत) याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या घटनेमुळे जत तालुक्यात खळबळ माजली आहे.
पंधरा वर्षीय मुलीचा विनयभंग व बाललैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी किसन टेंगले याच्याविरोधात सहा महिन्यांपूर्वी जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रफिकअहमद शेख याच्याकडे आहे. जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे पोलिस भरतीच्या बंदोबस्तासाठी सांगली येथे गेले आहेत. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त कार्यभार शेख याच्याकडे आहे. टेंगले याला गुन्ह्याच्या तपासकामात सहकार्य करून न्यायालयात त्याचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्रोटक माहिती असलेले आरोपपत्र दाखल करतो, असे शेख याने सांगितले होते. ५० हजार रुपयांवर हा सौदा ठरला होता. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून टेंगले याने शेख याला शनिवारी दहा हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. दरम्यानच्या काळात टेंगले याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाने शनिवारी सापळा लावला होता. जत पोलिस ठाण्यातील शेख याच्या कार्यालयातच दहा हजारांची लाच स्वीकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे जत तालुक्यात खळबळ माजली आहे.
 

Web Title: The arrest of a fugitive bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.