खाडे यांना अटक करा
By Admin | Published: October 10, 2016 12:57 AM2016-10-10T00:57:03+5:302016-10-10T00:57:03+5:30
महापालिका : पदाधिकाऱ्यांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
कोल्हापूर : शिवाजी मार्केट प्रभाग समितीच्या सभेमध्ये कचरा उठाव करण्याच्या समस्येवर नगरसेविका माधवी गवंडी यांना उद्धट व लज्जा उत्पन्न होईल, असे अपशब्द वापरल्याने महापालिकेचे सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी महापालिका पदाधिकाऱ्यांनी रविवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी खाडे यांच्यावर गुन्हा दाखल असून त्यांना पोलिस ठाण्यात हजर करा, यासंबंधी आयुक्त पी. शिवशंकर यांना पत्रव्यवहार करून पुढील कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. महापालिकेचे सहायक आयुक्त खाडे यांना प्रभाग समिती सभापतींच्या केबिनमध्ये कोंडून घालत धमकी दिल्याप्रकरणी नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती, माजी नगरसेवक प्रकाश आनंदराव गवंडी यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली होती. यावेळी गवंडी यांच्या पत्नीने लक्ष्मीपुरी पोलिसांत खाडे यांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी खाडे यांच्याविरोधात ‘कलम ५०९’ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रकाश गवंडी यांना तत्काळ अटक केली. सहायक आयुक्त खाडे यांना अटक न केल्याने महापालिकचे पदाधिकारी संतप्त झाले. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सर्वजण लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या केबिनमध्ये ठिय्या मांडत खाडे यांना अटक करा, अशी मागणी केली. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक डी. एम. गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला; परंतु संतप्त पदाधिकाऱ्यांनी खाडे यांना अटक न केल्याने महिला नगरसेवकावर अन्याय केला जात आहे. त्यांना पहिला अटक करा, मग तुमची चौकशी करा, अशी मागणी केली. त्यावर चव्हाण यांनी खाडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यांना पोलिस ठाण्यात हजर करा, असे पत्र आयुक्तांना आज, सोमवारी सकाळी अकरापर्यंत दिले जाईल. त्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, अजिंक्य चव्हाण, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, शारंगधर देशमुख, महेश सावंत, सचिन पाटील, माधवी गवंडी, अॅड. सूरमंजिरी लाटकर, सरिता मोरे, वहिदा सौदागर, माजी नगरसेवक आदिल फरास, राजू लाटकर, नंदू मोरे आदी उपस्थित होते.