बनावट क्रीडा प्रमाणपत्रप्रकरणी तत्कालीन क्रीडा उपसंचालक व क्रीडा मार्गदर्शक यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:10 AM2020-10-13T11:10:29+5:302020-10-13T11:12:41+5:30
moscexam, kolhapur, Sangli, crimenews महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी न करता ते योग्य असल्याचा चुकीचा निर्वाळा दिल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सांगलीचे तत्कालीन क्रीडा उपसंचालक व क्रीडा मार्गदर्शक अशा दोघांना सोमवारी अटक केली.
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी न करता ते योग्य असल्याचा चुकीचा निर्वाळा दिल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सांगलीचे तत्कालीन क्रीडा उपसंचालक व क्रीडा मार्गदर्शक अशा दोघांना सोमवारी अटक केली.
अनिल मारुतीराव चोरमले (वय ५४, रा. पीयूष व्हिला अपार्टमेंट, कात्रज डेअरी शेजारी, धनकवडी, पुणे) असे क्रीडा उपसंचालकाचे, तर प्रशांत जिवाजीराव पवार (५३, रा. गुलमोहर कॉलनी, अमित अपार्टमेंट, सांगली) क्रीडा मार्गदर्शक अशी संशयितांची नावे आहेत. त्यामुळे अटक केलेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
गेल्याच महिन्यात याप्रकरणी जिम्नॅस्टिक असोसिएशनचा सांगली जिल्हाध्यक्ष दीपक बाबासाहेब सावंत (रा. मिरज), संघटनेचा राज्य सेक्रेटरी महेंद्र आनंद चेंबूरकर (वय ६२, रा. मुंबई) व खेळाडू विजय सदाशिव बोरकर (रा. शंभर फुटी रोड, सांगली) या तिघांना अटक केली होती.
उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीवेळी क्रीडा स्पर्धेतील बनावट प्रमाणपत्र जोडल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय कोल्हापूर विभागाचे क्रीडा अधिकारी शंकर भास्करे (रा. सांगली) यांनी चौकशीअंती फिर्याद दिली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१६ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या मुलाखतीवेळी बोरकरने जोडलेल्या प्रमाणपत्राबद्दल अधिकाऱ्यांना शंका आली. त्याची भास्करे यांनी चौकशी केली. त्यांनी ८ जूनला कोल्हापुरात जुना राजवाडा पोलिसांत तिघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार बोरकर, सावंत व चेंबूूरकर या तिघांना अटक झाली होती.
दरम्यान, हे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवले असता, त्यावेळचे सांगली-कोल्हापूरचे क्रीडा उपसंचालक चोरमले यांनी ते योग्य असल्याचा चुकीचा निर्वाळा दिला होता, त्याला प्रशांत पवार यानेही साथ दिली. त्यामुळे सोमवारी या दोघांवर अटकेची कारवाई केली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.