बेळगावात संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट, २०१८ मध्ये आचारसंहिता भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:49 PM2020-02-08T13:49:53+5:302020-02-08T13:53:33+5:30
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश बेळगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने दिले आहेत.
बेळगाव : आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश बेळगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने दिले आहेत.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भिडे यांच्या विरोधात २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला होता. या खटल्याच्या कालच्या सुनावणीस भिडे हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायाधीशांनी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.
येळ्ळूर मधील महाराष्ट्र मैदानावर १३ एप्रिल २०१८ ला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी भिडे हजर होते. त्यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होती.
भिडे यांनी त्या समारंभात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करण्याबाबत आवाहन केलं होतं, तसेच समितीच्या उमेदवारांच्या, विरोधातील उमेदवारांना त्यांची जागा दाखवावी, अस वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होत.