Crime News: राधानगरी जंगलातून बेकायदा घोरपड नेणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 04:40 PM2022-06-20T16:40:04+5:302022-06-20T16:52:42+5:30
जंगलातून विनापरवाना घोरपड नेत असताना रंगेहाथ पकडले. या गुन्हाची आरोपीने कबुली दिली आहे.
कोल्हापूर : राधानगरीच्या जंगलातून बेकायदा घोरपड नेत असताना राधानगरी वन्यजीव विभागाने बाचणी येथील एकास अटक केली आहे. रजेनाल हालेस डिसोझा असे त्याचे नाव आहे.
राधानगरी वन्यजीव विभागाचे वनपाल संजय कांबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी वन खात्याच्या फराळे तपासणी नाक्याच्या वनरक्षक तेजस्विनी पोवार, निदानखणचे वनरक्षक भैरवनाथ नारायण यादव यांनी रजेनाल हालेस डिसोझा (वय ४३, रा. काळम्मावाडी वसाहत बाचणी, ता. कागल) हे जंगलातून विनापरवाना घोरपड नेत असताना रंगेहाथ पकडले. या गुन्हाची आरोपीने कबुली दिली आहे.
भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, २७, २९, ३९, ४३, ५१ अन्वये अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वन्यजीवचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी, राधानगरीचे वनक्षेत्रपाल एस. एस. पाटील अधिक तपास करत आहेत.