पलायन केलेल्या चोरट्यास अटक

By admin | Published: August 3, 2015 12:38 AM2015-08-03T00:38:14+5:302015-08-03T00:39:07+5:30

हुपरीत कारवाई : ‘सीपीआर’मधून वैद्यकीय तपासणीवेळी पळाला होता

The arrested thieves are arrested | पलायन केलेल्या चोरट्यास अटक

पलायन केलेल्या चोरट्यास अटक

Next

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या मोटारसायकल चोरट्याने रविवारी दुपारी पोलीस हेडकॉन्स्टेबलला चकवा देत पलायन केले. संशयित आरोपी धनाजी बाळासो नाईक (वय ४२, रा. रेंदाळ, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. या घटनेचे वृत्त जिल्ह्यात पसरताच खळबळ उडाली होती. दरम्यान, हुपरी (ता. हातकणंगले) येथील यळगूड चौकात रात्री आरोपी धनाजी नाईकला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. मध्यवर्ती बसस्थानक येथील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी धनाजी नाईक याला शाहूपुरी गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. १) रात्री ताब्यात घेतले होते. रविवारी सकाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन-तीन कार्यक्रम असल्याने बंदोबस्तामध्ये पोलीस व्यस्त होते. हेडकॉन्स्टेबल प्रशांत नाईक हे रात्रपाळी करून सकाळी नऊ वाजता घरी गेले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना साडेनऊ वाजता फोन करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यानुसार नाईक हे दुपारी बाराच्या सुमारास पोलीस ठाण्यात आले. यावेळी त्यांना मोटारसायकल चोरीतील आरोपी नाईक याची वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयात हजर करण्यास सांगितले. त्यानुसार ते त्याला घेऊन पोलीस जीपमधून वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास ‘सीपीआर’मध्ये आले. जीपचालक सखाराम कांबळे हे बाहेर गाडीमध्येच बसून राहिले. हेडकॉन्स्टेबल नाईक हे आरोपीला अपघात विभागात घेऊन गेले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बाहेरील खाटेवर बसविण्यात आले; तर वैद्यकीय अहवाल घेण्यासाठी हेडकॉन्स्टेबल नाईक डॉक्टरांसमोर बसले. याच दरम्यान तळंदगे (ता. हातकणंगले) येथील मोटारसायकल अपघातातील चौघा जखमींना ‘सीपीआर’मध्ये आणले होते. यावेळी त्यांच्यासोबत वीस-तीस नातेवाइकांचा घोळका आल्याने अपघात विभागात गोंधळ उडाला. या गर्दीचा फायदा घेत आरोपी धनाजी नाईक याने तिथून पलायन केले.
नातेवाइकांच्या गर्दीमध्ये हेडकॉन्स्टेबल नाईक यांना आरोपी दिसून आला नाही. नातेवाइकांची पांगापांग झाल्यानंतर खाटेवर बसविलेला आरोपी गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली; परंतु तो आढळून आला नाही. सीपीआर पोलीस चौकीतील पोलीस व सीपीआरच्या कर्मचाऱ्यांकडे त्यांनी चौकशी केली; परंतु त्यांनीही हात वर करीत आम्हाला काही माहीत नसल्याचे सांगितले. आरोपीच्या पलायनाने घामाघूम झालेल्या नाईक यांनी जीपचालक कांबळे यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीही आपण त्याला पाहिले नसल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांनी ‘सीपीआर’चा संपूर्ण परिसर पिंजून काढला; परंतु तो सापडला नाही.
दरम्यान, बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक शाहू भोसले यांना ही माहिती समजताच त्यांनी ‘सीपीआर’कडे धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आरोपीचा शोध घेण्याच्या सर्व पोलिसांना सूचना केल्या. त्यानुसार मध्यवर्ती बसस्थानक, हुपरी-रेंदाळ, कागल यांसह आरोपींच्या नातेवाइकांची घरे पोलिसांनी पिंजून काढली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.
हुपरीत झडप घालून पकडले
सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीवेळी पलायन केलेला मोटारसायकल चोरटा धनाजी बाळासो नाईक याला रविवारी रात्री हुपरी येथील यळगूड चौकातून ताब्यात घेण्यात आले. नाईक याला शोधण्यासाठी सर्वत्र पोलिसांची पथके गेली होती.


माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ
आरोपी धनाजी नाईक पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन पसार झाल्यानंतर याबाबतची माहिती घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दुपारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले. यावेळी येथील ठाणे अंमलदाराने माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही ‘आम्ही बंदोबस्तात आहोत, थोड्या वेळाने पोलीस ठाण्यात येऊन माहिती घेऊन सांगतो,’ असे उत्तर देऊन जबाबदारी झटकली.
...अन् ठाण्यातच
डोळे भरून आले
प्रशांत नाईक याचे मूळ गाव हणबरवाडी (ता. गडहिंग्लज) आहे. ते यापूर्वी शहर वाहतूक शाखेमध्ये होते. पंधरा दिवसांपूर्वी ते शाहूपुरी पोलीस ठाण्यात रुजू झाले आहेत. ‘आरोपीला घेऊन जाताना त्याला बेड्या घालून घेऊन जातो,’ असे ते म्हणाले होते, परंतु गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ‘त्याला जामीन होणार आहे, तसेच घेऊन चला’, असे सांगितल्यामुळे ते त्याला बेड्या न घालता घेऊन गेले. आरोपीने पलायन केल्याने वरिष्ठांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. या घटनेमुळे नोकरीवर पाणी सोडावे लागणार या भीतीने पोलीस ठाण्यातच त्यांचे डोळे भरून आले.

Web Title: The arrested thieves are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.