कर्जाच्या आमिषाने फसवणाऱ्या उत्तरप्रदेशमधील भामट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:15 PM2019-07-29T14:15:19+5:302019-07-29T14:21:43+5:30
प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी फायनान्स कंपनीतून आठ कोटी ४० लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त बॅँक अधिकाऱ्यास २२ लाख ३७ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आणखी एका भामट्यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी रविवारी अटक केली.
कोल्हापूर : प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी फायनान्स कंपनीतून आठ कोटी ४० लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त बॅँक अधिकाऱ्यास २२ लाख ३७ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आणखी एका भामट्यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी रविवारी अटक केली.
संशयित आरोपी अमितकुमार ऊर्फ राहुल गंगाराम कमल (वय २९, रा. रमणीपुरम, उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी त्याचा साथीदार अजय गंगादास दास (२२ रा. आर्यनगर, दिल्ली, मूळ बिहार) याला अटक केली होती. सध्या तो कारागृहात आहे.
निवृत्त बँक अधिकारी गजानन राजाराम भोसले (६३, रा. संभाजीनगर) यांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज हवे होते. वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार त्यांनी दिल्लीतील एका फायनान्स कंपनीशी ७ नोव्हेंबर, २०१७ रोजी फोन वरून संपर्क साधला.
यावेळी संशयित अजय दास याने तुमचे आठ कोटींचे कर्ज मंजूर झाले आहे. मंजुरीचा रिपोर्ट ई-मेलवर पाठवतो. कर्ज मंजुरीचे पत्र पाठविल्यानंतर काही दिवसांनी संशयित दास याने प्रोसेसिंग फी म्हणून वेळोवेळी पैशांची मागणी केली.
१३ डिसेंबर २०१७ ते २ जुलै २०१८ या कालावधीत भोसले यांच्याकडून फायनान्स कंपनीने बॅँक खाते, एनईएफटी अशा प्रकारे २२ लाख ३७ हजार रुपये उकळले होते. हे मोठे रॅकेट असून आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले.
याच प्रकरणात पोलिसाने घेतली होती लाच
फसवणूक प्रकरणातील आरोपीला दिल्लीतून पकडून आणण्यासाठी प्रवासखर्च म्हणून २५ हजार रुपयांची मागणी करून ती लक्ष्मीपुरी पद्मा चौकातील एजंट चहा विक्रेत्यातर्फे स्वीकारल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचा संशयित हवालदार अजिज रमजान शेख (रा. लाईन बझार, कसबा बावडा, कोल्हापूर) व एजंट दाऊद बाबालाल पाटणकर (रा. रविवार पेठ, कोल्हापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी फसवणूक प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या.