सीताफळांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:07+5:302021-07-19T04:17:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बाजारात यंदा सीताफळांची लवकरच एंट्री झाली आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बाजारात यंदा सीताफळांची लवकरच एंट्री झाली आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात १८०० रुपये डझनापर्यंत दर पाेहोचला आहे. त्याचबरोबर पिवळ्याधमक पपईने बाजार फुलला आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली असल्याने दरात काहीशी घसरण झाली आहे.
फळबाजारामध्ये पेरू, तोतापुरी आंबा, ड्रॅगन फळ, खजूर, डाळींब, सफरचंद, अननसाची रेलचेल सुरू आहे. सीताफळाची आवकही सुरू असून रविवारी बाजार समितीत सीताफळाचे ३९० ढीग होते. साधारणत: प्रतवारीनुसार २०० ते १८०० रुपये ढीग असा दर आहे. एका ढिगात एक डझन सीताफळे असतात.
भाजीपाला बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. पावसाने उघडीप दिल्याने आवक चांगली असली तरी दरात घसरण होऊ लागली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोबी, वांगी, ओली मिरची, ढब्बू, गवार, कारली, भेंडी, वरणा, वालच्या दरात घसरण झाली आहे. वाटाण्याची आवकही चांगली आहे; त्यामुळे घाऊक बाजारात ७० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोपर्यंत दर आहे. टोमॅटो, घेवडा, दोडका, बिनीस, फ्लॉवरच्या दरात तुलनेत थोडी वाढ झालेली दिसते. कोथिंबिरीची आवक वाढली आहे. बाजार समितीत रोज ४० हजार पेंढ्यांची आवक होत असल्याने तेवढा उठाव हाेत नाही. परिणामी घाऊक बाजारात शेकडा ६०० रुपये दर राहिला आहे. मक्याच्या कणसांची आवक वाढली असून ६०० रुपये शेकडा दर आहे, मात्र किरकोळ बाजारात कणसाचा दर दहा रुपये आहे.
पालेभाज्यांची आवक स्थिर आहे. कांदापात दहा रुपये, तर मेथी पंधरा रुपये पेंढी आहे. पालक, पोकळा मात्र सात रुपयांवर स्थिर राहिला आहे.
महाराष्ट्रीय बेंदूर तोंडावर आल्याने सरकी तेलाच्या दरात पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सध्या १५० रुपये किलो असले तरी घाऊक बाजारात मात्र किलोमागे तीन-चार रुपयांची वाढ दिसते. डाळींसह साखर, रवा, आटा, मैद्याचे दर स्थिर आहेत.
किरकोळ बाजारातील दर प्रतिकिलाे असे -
तूरडाळ - ११०, हरभराडाळ - ७०, मूगडाळ - ११०, मूग -१००, शाबू - ६०, साखर - ३५, रवा - ३५, आटा - ३०, मैदा - ३०, खोबरे - १८०.
फोटो ओळी :
१) कोल्हापुरातील फळबाजारामध्ये रविवारी सीताफळांची आवक वाढली होती. (फोटो-१८०७२०२१-कोल-बाजार)
२) पिवळ्याधमक पपईने बाजार फुलला होता. (फोटो-१८०७२०२१-कोल-बाजार०१) (छाया- नसीर अत्तार)