बावडा गवत मंडईत गवताची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:19+5:302021-07-11T04:17:19+5:30
येथील गवत मंडईत कसदार सडीच्या हिरव्या गवताची आवक मुबलक प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. ...
येथील गवत मंडईत कसदार सडीच्या हिरव्या गवताची आवक मुबलक प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. सध्या १ हजार रुपये शेकडा गवताच्या पेंडीचा दर आहे.
मे महिन्याच्या अखेरीस जोरदार तीन-चार वळीव पाऊस झाल्याने नदीकाठच्या कसदार गवताची पहिली कापणी जूनच्या अखेरीस आली होती. मात्र, पुरामुळे ही कापणी शेतकऱ्याला घेता आली नाही. गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी गवताची कापणी सुरू केली आहे. याचा परिणाम कसबा बावडा गवत मंडईमध्ये येणाऱ्या वैरणीच्या आवकेवर झाला आहे.
यापूर्वी बांधावरील गवत दीड हजार रुपये शेकडा मिळत होते. परंतु, आता आवक वाढल्याने मळीचे, कसदार व सडीचे गवत हजार रुपये शेकडा मिळू लागले आहे. आवक वाढल्याने कोल्हापुरातील काही व्यापारी येथे गवत खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. सायंकाळी सातपर्यंत मंडईत गवताच्या खरेदीची उलाढाल होते. काही शेतकरी गवताबरोबर उसाच्या पाल्याची वैरणही विक्रीसाठी घेऊन येतात.
फोटो : १० बावडा गवत
कसबा बावडा गवत मंडईत कसदार सडीच्या गवताची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने गवताचे दर उतरले आहेत.
( फोटो :रमेश पाटील,कसबा बावडा)