कोल्हापुरातील महागणपतीचे मोठ्या उत्साहात आगमन, पहिल्याच दिवशी दर्शनासाठी खुला होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:33 PM2023-09-13T12:33:10+5:302023-09-13T12:34:04+5:30
आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या अंथरून महागणपतीचे स्वागत
कोल्हापुर : आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या, ढोल-ताशांचा निनाद, मोरयाचा अखंड गजर अशा भक्तीमय वातावरणात येथील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी महागणपतीचे मंगळवारी उत्साहात आगमन झाले. हा गणपती पाहण्यासाठी बिंदू चौकात महिलांसह बालचमुंनी मोठी गर्दी केली होती.
येत्या मंगळवारी गणेशाची प्रतिष्ठापना होणार असून शिवाजी चौक तरुण मंडळाच्या महागणपतीचे मंगळवारी आगमन झाले. मार्केट यार्डातून दुपारी दोन वाजता महागणपतीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. सायंकाळी साडेपाच वाजता बिंदू चौकात ही मिरवणूक पोहचली. आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या अंथरून महागणपतीचे स्वागत करण्यात आले.
मोरयाचा अखंड गजर व आम्ही कोल्हापुरकर ढोल-ताशा पथकाच्या वाद्याने बिंदू चौक परिसर निनादुन गेला. बिंदू चौकातून महागणपतीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कृष्णराज महाडिक, मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू, सुहास भेंडे, प्रसाद वळंजू, अक्षय शिंदे, गणेश वळंजू, दिलीप खोत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी दर्शनासाठी खुला होणार
प्रत्येक वर्षी महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्ती गर्दी करत असतात. यंदा १९ सप्टेंबरला प्रतिष्ठापणा झाल्यानंतर पहिल्याच दिवशी महागणपती दर्शनासाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली.