‘कलातपस्वीं’चा जीवनपट उलगडला
By admin | Published: October 31, 2014 01:08 AM2014-10-31T01:08:01+5:302014-10-31T01:09:28+5:30
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती : चंद्रकांत जोशी यांच्या सत्तरी पूर्णत्वाची सायंकाळ रंगली
कोल्हापूर :
‘मळकट भिंतीवरती चित्र
कशाचे काढू,
पांढऱ्या खडूच्या रेषी स्वत:लाच पाहू,
प्रकाश पाहण्यासाठी सावलीत
राहू की, प्रकाश पांघरण्या
काळवंडून जाऊ’,
असे जीवनगीत घेऊन कला, चित्रपट क्षेत्रात आयुष्य व्यतीत करणाऱ्या कलातपस्वी दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचा जीवनपट आज, गुरुवारी आठवणींतून उलगडला. निमित्तं होतं... दिग्दर्शक जोशी यांच्या वयाची सत्तरी पूर्णत्वाच्या सोहळ्याचं.
चंदू, दादा, काका, मामा, सर, आजोबा या आणि अशा कैक रूपांत अनेकांच्या आयुष्यात कार्यरत असलेल्या दिग्दर्शक जोशी यांचा सोहळा त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शिष्य आणि मित्र परिवाराने आयोजित केला होता. अक्षता मंगल कार्यालयातील या सोहळ्यास ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर, चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, अशोक राणे, चित्रकार रवी परांजपे, श्यामकांत जाधव, साहित्यिक राजन खान, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, उद्योगपती व्ही. बी. पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
वेदपठणाने जोशी यांच्या सत्तरी पूर्णत्वाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर जोशी व त्यांच्या पत्नी मंगल यांचे त्यांची मुलगी संगीता, सून सोनाली, वैशाली, नीता आणि पुतणी मुग्धा, पूर्वा व नात गार्गी यांनी औक्षण केले. त्यानंतर लघुपटातून जोशी यांच्या जीवनाची झलक उपस्थितांना घडविली. आंशुमन, नचिकेत, ऋतूपर्णा, अन्वय, शार्दुल या नातवंडांनी छोट्याशा नाटिकेतून आजोबांचा वारसा दाखवून दिला. पल्लवी कुलकर्णी, अजय पूरकर, आदींनी गायनातून सोहळ्यात रंग भरला. वैभव जोशी यांनी काव्यातून शुभेच्छा दिल्या.
कुटुंबिय, नातेवाईक, शिष्य आणि मित्रपरिवाराने छोट्या-छोट्या आठवणींतून जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे दर्शन घडविले. शिवाय त्यांचा जीवनपट देखील उलगडला.
कार्यक्रमास अनंत कुलकर्णी, अनिरुद्ध जोशी, गोपाळराव जोशी, पोतदार, अनंत खासबारदार,शिरीष खांडेकर, सागर बगाडे, दिलीप बापट, सुभाष भुर्के, अजेय दळवी, पवन खेबुडकर, आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ऋषिकेश जोशी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)