शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचे अस्सल सोनं आठवड्यात बेन्टेक्स कसे झाले?, जनतेतून विचारणा
By विश्वास पाटील | Published: July 18, 2022 08:57 AM2022-07-18T08:57:44+5:302022-07-18T08:59:25+5:30
लोकसभेला भाजपच्या उमेदवारीसाठी आधीच टाकला रुमाल.
विश्वास पाटील
कोल्हापूर : गेल्या रविवारी शासकीय विश्रामधाममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जे शिवसेनेला सोडून गेले ते बेंन्टेक्स होते व आता अस्सल सोनंच पक्षात राहिले आहे असे छातीठोकपणे सांगणारे खासदार संजय मंडलिक हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे मंडलिक यांचे अस्सल सोनं आठवड्यात बेन्टेक्स कशामुळे झाले अशी विचारणा आता लोक करु लागले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे २०२४ च्या निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांनी भाजपकडे आताच रुमाल टाकला आहे व त्यासाठीच शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.
धनंजय महाडिक हे राज्यसभेवर गेल्याने भाजपकडे उमेदवार नाही. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा मंडलिक यांच्या विजयात मोठा वाटा होता आणि २०२४ लाही तोच फायदा होईल असे गणित मांडून त्यांनी ही हनुमान उडी घेतली. मंडलिक हे गेल्या निवडणुकीतही सक्षम उमेदवार या प्रतिमेपेक्षा महाडिक नकोत या लाटेवर स्वार होवून विजयी झाले. आताही त्यांना मोदी लाटेवर स्वार व्हायचे आहे. कोल्हापूरची जनता ही स्वत:ची लाट निर्माण करणारी आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत या जनतेने अशीच लाट निर्माण केली म्हणूनच काँग्रेसच्या चिन्हावर एक सामान्य महिला आमदार झाल्या. कोणत्याही लाटेवर स्वार होवून कोल्हापूरात विजय मिळवता येत नाही. कोल्हापूर हे शहर प्रवाहाच्या उलटे पोहणारे आहे. त्याच ओळखीचा या शहराला कायमच अभिमान वाटला आहे.
इतिहास फार लांबचा नाही. लोकसभेच्याच २०१४ च्या निवडणुकीत देशात आता नाही त्याच्या कितीतरी पट मोठी मोदी यांच्या करिष्म्याची लाट होती. तरीही कोल्हापूरने मंडलिक यांचाच पराभव करून राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना निवडून दिले. निवडून आल्यानंतर ते राष्ट्रवादी व काँग्रेसशीही प्रामाणिक राहिले नाहीत. त्याची चीड म्हणून लोकांनी अगोदर महाडिक यांचा पराभव केला व त्यामुळे मंडलिक यांचा विजय झाला. आता मंडलिकही पुन्हा त्याच वाटेने गेले. त्यांनी आमचं ठरलंय अशी टॅगलाईन घेऊन मैदानात उतरून विजयाची हवा निर्माण केलेल्या माजी सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांचीही फसवणूक केली आहे. कोल्हापूरचा माणूस राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहे. तो सर्वांचे मोजमाप वेळ आली की बरोबर करतो. त्याने २००९ च्या निवडणूकीत थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही असेच मोजमाप करून दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांना इर्षेने निवडून दिले होते हा इतिहास ताजा आहे.
शिवसेनेचे पहिले खासदार..
शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाच्या काळात मंडलिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आधार देण्यासाठी मातोश्रीवर थांबून होते. पक्षाच्या या कसोटीच्या काळात शिवसेनेसोबतच आहात याबद्दल समाजांतूनही चांगल्या प्रतिक्रिया होत्या. कारण त्याच पक्षाने मंडलिक यांना एकदा सोडून दोनदा उमेदवारी दिली. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून आतापर्यंत १९९१ पासून गेल्या ३१ वर्षात शिवसेनेने सात उमेदवार दिले. परंतु ही जागा जिंकता आली नव्हती. ती मंडलिक यांच्या रुपाने पहिल्यांदा जिंकली. परंतु शिवसेनेच्या पहिल्या खासदाराने अडीच वर्षात पक्षाशी गद्दारी केली अशीच इतिहासात नोंद झाली.
नवा घरोबा याचसाठी...
खासदार म्हणून लोकसभेत कर्तृत्व दाखवण्याची संधी होती, पक्षात मानाचे स्थान होते. परंतु मागच्या पाच वर्षातही मंडलिक यांनी पक्षासाठी काय केले व निवडून आल्यावरही या अडीच वर्षात काय केले हा संशोधनाचाच विषय आहे. कदाचित त्याचेच उत्तर द्यावे लागू नये म्हणून त्यांनी नवीन घरोबा केला असण्याचीही शक्यता जास्त आहे.
लोकसभा २०१९ चा निकाल..
संजय मंडलिक (शिवसेना) : ७,४९,०८५
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) : ४,७८,५१७
मताधिक्क्य : २,७०,५६८
संघर्षाचा इतिहास पण....
स्वाभिमानास ठेच पोहोचली म्हणून दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक हे २००९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत वयाच्या पंचाहत्तरीतही शड्डू ठोकून मैदानात उतरले. पक्षाला आव्हान दिले. त्यांनी जेव्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा एकही नेता त्यांच्यासोबत नव्हता. परंतु त्यांची आव्हान देण्याची जिगर सामान्य जनतेला आवडली व ते जिंकले. मंडलिक या आडनावाचा असा संघर्षाचा इतिहास असताना आपण लाटेसोबत वाहत गेलात याचाच धक्का अनेकांना बसला.