सदर बझारमध्ये कृत्रिम पाणी टंचाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 02:05 PM2017-09-14T14:05:48+5:302017-09-14T14:08:07+5:30
नवीन पाणी योजनेअंतर्गत सदर बझार येथील ग्रंथालयासमोर चार लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. यातून या परिसराला मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी काही विघ्नसंतोषींकडून या टाकीवरचा भाग शौचालय म्हणून वापर केला जात असल्याने मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी या टाकीला जोडलेली घरातील नळ बंद केले आहे.
सातारा : नवीन पाणी योजनेअंतर्गत सदर बझार येथील ग्रंथालयासमोर चार लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. यातून या परिसराला मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी काही विघ्नसंतोषींकडून या टाकीवरचा भाग शौचालय म्हणून वापर केला जात असल्याने मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी या टाकीला जोडलेली घरातील नळ बंद केले आहे. यामुळे या परिसरात कृत्रिम पाणी टंचाई होत निर्माण होत आहे. याला जीवन प्राधिकरणच जवाबदार असल्याचा आरोप नागरिकांमधून केला आहे.
समाजकंटकाकडून टाकीच्या भिंतीबरोबर टाकीत देखील लघुशंका केली जात आहे तर टाकीवरच चक्क शौचालय म्हणून वापर केला जात असून, टाकीमध्ये उतरून बाकीचा विधी केला जात असल्याचे काही नागरिकांच्या निर्दशनात आल्याने या टाकीतील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले जात आहे. काही नागरिकांनी आपल्या घरातील नळाने टाकीतील येणारे पाणी भरले नसल्याने कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागला.
दरम्यान, गत सहा महिन्यांपूर्वीही असाच प्रकार घडला होता, त्यावेळी पालिका आरोग्य विभाग व जीवन प्राधिकरण कार्यालयातील अधिकाºयांनी पाहणी करून येथील स्वच्छता केली होती व टाकीही बाहेरून स्वच्छ करून टाकीजवळ बंदिस्त कुंपण घालण्याचे आश्वासन दिले होते; परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा तीच परिस्थिती येथे पाहायला मिळत आहे. यासाठी याला जबाबदार असणाºया अधिकाºयांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे भारत माता मंडळाचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
या परिसरात वारंवार मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असल्याचा पुरावा देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तर याच परिसरातील ‘स्वाईन फ्लूू’ने दोघांना जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील याची पालिका आरोग्य विभाग याचे दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. टाकीवर दुर्गंधी पसरल्याने नाक मुठीतच धरून जावे लागत आहे. हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरवठा केला जात आहे. यासाठी ही टाकी स्वच्छ धुऊन मगच पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
मैलामिश्रित पाण्याची टाकी...
टाकीवरील मैला पावसाच्या पाण्याने या टाकीत जात आहे. टाकीला झाकण नसल्याने टाकीतच लघुशंका केली जात असून, टाकीमध्ये दारूच्या बाटल्या, गुटखा पुड्या, सिगारेट तर टाकीच्या वर असलेल्या छोट्याशा छिद्रामधून गुटख्याच्या पिचकाºयाही पाहायला मिळत आहे. याचा पुरावाही येथील नागरिकांनी दिला आहे, तरी देखील मागील सहा महिन्यांपासून यावर उपाययोजना होत नाही.
एकावं ते नवलच..
एकीकडे शासनाचा हगणदारीमुक्तीकडे वाटचाल असताना सदर बझारमध्ये घडलेल्या या कृत्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एकीकडे हणगदारीमुक्त उपक्रमाचे राज्यात सातारा जिल्ह्याचा गौरव होत असताना मात्र काही समाजकंटकाकडून उघड्यावर शौचालय करता येत नाही म्हणून चक्क ५० फूट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर जाऊन शौचालय करून पाणी दूषित करण्याची मजल जात आहे. या कृत्याची चर्चा आज दिवसभर सदर बझारमध्ये रंगली होती.