कलाविष्काराला तरुणाईची दाद
By admin | Published: October 5, 2016 12:54 AM2016-10-05T00:54:10+5:302016-10-05T01:06:48+5:30
युवा महोत्सव : लावणी, जोगवा, मूकनाट्य
संतोष मिठारी / आयुब मुल्ला-- रहिमतपूर (जि. सातारा)
टाळ्या-शिट्ट्यांचा गजर, प्रतिसादाची साद, सातत्याने होणारा जल्लोष, कलेच्या देखण्या सादरीकरणाला उत्स्फूर्तपणे मिळणारी वाहवा, अशा जोशपूर्ण वातावरणात शिवाजी विद्यापीठाच्या ३६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा पहिला दिवस रंगला. तरुणाई अक्षरश: कलाविष्कारांतून फुलली, खुलली अन् अख्खा परिसर सांस्कृतिक कलेच्या प्रेमात पडला.
दिवसभरात १५ प्रकारांतील स्पर्धा झाल्या. महोत्सवातील मुख्य रंगमंचावर दुपारच्या सत्रात लोककला, लोकनृत्यात स्पर्धकांनी धमाल उडवून देत डोळ्यांचे पारणे फेडले. वन्समोअरचा तर सतत आग्रह होत राहिला. इतका कलाविष्कार दिलखेचक झाला. सप्तश्रृंगाराची उधळण असलेल्या लावण्यांचे सादरीकरण अप्रतिम होते. यातील ‘मला वाटलं होतं तुम्ही यालं...,’ ‘रात्र धुंदीत ही जागवा’ या लावण्यांच्या अदाकारीने सर्वांनाच ठेका धरायला लावला. लोककलेतील यल्लमाआईचा जोगवा, मरीआईचा गाडा यातून नृत्याची उंची दाखवून दिली. ‘डोंबारी ह्यो नाचतो तालावर...,’ या गीताने मन हेलावून टाकले. प्रत्येक गीत व त्याला साजेशा नृत्याने रसिकांना डोलायला लावले. तरुणाईने आनंद लुटताना कलाकारांना मनापासून दाद देत आपली रसिकता दाखवून दिली. रंगमंच दोनवरील मूकनाट्यांनी दहशतवादी हल्ल्याला भारताचे प्रतिउत्तर, भ्रष्टाचार, पर्यावरण, आदी विषयांतून प्रभावी भावभाष्य केले. लघुनाटिकांनी तर समाजातील भीषण वास्तवावर नेमकेपणाने बोट ठेवले. स्वच्छ भारत अभियान, कचरा, टेंडर, विविध प्राण्यांमधील चर्चासत्रातून जातीव्यवस्थेवर प्रहार, प्रत्येक क्षेत्रातील घुसखोरी, महिला स्वच्छतागृहांचा अभाव, आदी विषय हाताळत मानवी मनाच्या संकुचित मर्मावर घाव घातला. एकांकिकांमधील आशय उपेक्षित घटकांवर, प्रलंबित प्रश्न, भ्रष्ट कारभार, महिलांच्या समस्यांवर आधारित होता. एकपात्रीतून भावी कलाकारांची संख्या निश्चित वाढेल, असे दिसून आले.
रंगमंच तीनवरील नकलांनी पोट धरून हसविले. कोलाजमधून उत्सव, निसर्गचित्रण अप्रतिमपणे रंगविण्यात आले होते. मातकामात रिओ आॅलिम्पिक, भारतीय सैन्य दल या विषयांवरील आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या होत्या. व्यक्ती व निसर्ग चित्रण, वल्लरी, आॅलिम्पियाड गेम्स्, दुष्काळ या विषयांचे वास्तव रांगोळीतून रेखाटण्यात आले.
भारतीय समूहगीतांनी देशभक्तीसह विविधतेतील एकता जागविली. शास्त्रीय सूरवाद्य हा अत्यंत शिस्तबद्ध, कानाला तृप्त करणारा वादन प्रकार झाला. हाताची थाप, बोटे यातून तबला अन् सतार यांची मैफल सूरमय झाली. पाश्चिमात्य समूहगीतांतून स्वरलहरी पसरल्या. त्यातून पाश्चिमात्यांची चाल, डब साकारली. तालवाद्यांमध्ये विविध प्रकार सादर करताना स्पर्धकांचा कस लागला. स्पर्धक, समर्थक, रसिक, स्वयंसेवक अशा भूमिकेतील युवक-युवतींच्या गर्दीने महोत्सवाचा परिसर फुलला होता.
आज समारोप
महोत्सवाचा समारोप आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सकाळच्या सत्रात प्रश्नमंजूषा, एकांकिका, स्थळ चित्रण, फोटोग्राफी, सुगम गायन, लोकसंगीत वाद्यवृंद, पथनाट्य, व्यंगचित्र, वक्तृत्व, शास्त्रीय गायन, नृत्य, वादविवाद, भित्तीचित्र या स्पर्धा होणार आहेत.