बहरली चित्रनगरी : चित्रपट, मालिका चित्रीकरणाची वर्दळ सुखावह; कोल्हापुरातील कलावंत-तंत्रज्ञांना मिळाला रोजगार
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 14, 2024 15:49 IST2024-12-14T15:49:10+5:302024-12-14T15:49:39+5:30
इंदुमती गणेश कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरीत सध्या तीन मराठी मालिका आणि एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. कलाकारांची वर्दळ, ...

छाया-नसीर अत्तार
इंदुमती गणेश
कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरीत सध्या तीन मराठी मालिका आणि एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. कलाकारांची वर्दळ, दिग्दर्शकांची लाइट, कॅमेरा ॲक्शनची घाई आणि तंत्रज्ञांची धावपळ हे चित्र कोल्हापूरकर आणि रसिक म्हणून सुखावणारे आहे. त्यामुळे कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि ज्युनिअर आर्टिस्ट अशा १५० जणांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. अनेक प्रॉडक्शन हाऊसची टीम लोकेशन बघून जात आहे.
कोल्हापूर चित्रनगरीकडून आशा सोडून दिल्यापासून ते आता तेथे सुरू असलेल्या चित्रीकरणापर्यंतचा प्रवास समाधान देणारा आहे. सध्या येथील मुख्य जुन्या स्टुडिओत रामानंद सागर याांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. नव्याने झालेल्या एका स्टुडिओत आई तुळजाभवानी, त्यासमोरच्या स्टुडिओत ‘जोडी तुझी- माझी’ मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे.
आऊट डोअर लोकेशनमधील आश्रमात आणि गावात याच मालिकेचे भाग चित्रित केले जात आहेत. टिकली या मालिकेचेही अन्य एका स्टुडिओत चित्रीकरण सुरू आहे. अशा रीतीने सध्या चित्रनगरीत ३ मराठी मालिका आणि एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याने सर्वत्र माणसांची वर्दळ आहे.
प्रॉडक्शन हाऊसकडून रेकी..
महाराष्ट्रासह अन्य राज्यातील प्रॉडक्शन हाऊसच्या टीमकडून परिसराची रेकी केली जात आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी चित्रनगरीला भेट दिली तेव्हा दाेन वेगवेगळ्या टीम लोकेशन बघून त्यांचे छायाचित्र घेत होते. काही निर्मात्यांना वर्ष-दोन वर्षांसाठी स्टुडिओ हवे आहेत. त्यादृष्टीने व्यवस्थापनाची तयारी सुरू आहे.
चित्रीकरणाला प्राधान्य का?
- व्यवस्थापनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रचंड सवलती आणि सुविधा.
- मुंबई-पुण्याच्या तुलनेत चित्रीकरणाचा खर्च निम्म्यावर
- वेळेचे बंधन नाही
- बघ्यांची गर्दी होऊन चित्रीकरणात अडथळा नाही.
- प्रॉडक्शन हाऊसच्या अपेक्षेनुसार लोकेशन्स.
चित्रनगरी व्यवस्थापनाकडून अतिशय चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या आहेत. चांगले सहकार्य केले जाते. शांततेत आणि मुंबई-पुण्याच्या तुलनेत कमी कॉस्टमध्ये चित्रीकरण होते. कोल्हापूरबद्दल नेहमीच प्रेम आणि जिव्हाळा आहे. कलाकार-तंत्रज्ञांकडून व्यवस्थित कामे होतात. - समीर कवठेकर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, आई तुळजाभवानी
चित्रपटसृष्टीची भूमी असल्याने कोल्हापुरात कलाकार तंत्रज्ञांची कमी नाही. काम मिळणे महत्त्वाचे होते. चित्रनगरीच्या विकासामुळे येथे सातत्याने चित्रीकरण सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील १५० हून अधिक जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. - समीर मालदार, प्रॉडक्शन मॅनेजर, हिंदी चित्रपट