कलाकारांचा बुधवारी मंत्रालयाबाहेर ‘कलाबाजार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:28 AM2021-09-24T04:28:45+5:302021-09-24T04:28:45+5:30
कोल्हापूर : राज्यातील नाट्यगृहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी, या मागणीसाठी रंगकर्मींनी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. याअंतर्गत बुधवारी (दि. ...
कोल्हापूर : राज्यातील नाट्यगृहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी, या मागणीसाठी रंगकर्मींनी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. याअंतर्गत बुधवारी (दि. २९) मंत्रालयाबाहेर ‘सांस्कृतिक कलाबाजार’ भरवण्यात येणार असल्याची माहिती सुनील घोरपडे, प्रसाद जमदग्नी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत लवकरात लवकर शासनाने निर्णय घेतला नाही, तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
ते म्हणाले, नाट्यगृहे व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी, यासाठी रंगकर्मींनी सलग आठ दिवस विविध ठिकाणी सांस्कृतिक कला बाजार भरवला. राज्यातील रंगकर्मींनी नऊ ऑगस्टला मूक आंदोलन केल्यानंतर १ सप्टेंबरपासून नाट्यगृहे सुरू केली जातील, अशी ग्वाही शासनाने दिली होती. पण नंतर काही दिवसांनी तारीख बदलून पाच नोव्हेंबर करण्यात आली. खरंतर गणेशोत्सवापासून मनोरंजनाचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे नाट्यगृहांबरोबरच सर्वप्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम अटी व नियमांसह सुरू व्हावेत, अशी आमची मागणी आहे. मंत्री आणि लोकप्रतिनिधींनाही निवेदने दिली; पण काही उपयोग झाला नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने सर्वांच्या संतप्त भावना आहेत. त्यामुळे आता थेट मुंबईत धडक देऊन शासनाचे लक्ष वेधले जाईल.
या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधींपासून मंत्री, खासदार, आमदारांपर्यंत निवेदने देण्यात आली; मात्र कोणीही अजून सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आगामी काळात निवडणुकांवरही बहिष्कार घालू, असा इशारा यावेळी देण्यात आला. परिषदेला मुकुंद सुतार, रोहन घोरपडे, श्रध्दा शुक्ल यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते.
--