कलाकारांनी कलेचा आदर करावा : संभाजीराजे-राजा परांजपे महोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:13 AM2018-04-15T01:13:56+5:302018-04-15T01:14:31+5:30
कोल्हापूर : कला अवगत करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. त्यातून कलेची निर्मिती होते. त्यामुळे कलाकारांनी कलेचा आदर करावा. कोणापुढे झुकू नये, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी
कोल्हापूर : कला अवगत करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. त्यातून कलेची निर्मिती होते. त्यामुळे कलाकारांनी कलेचा आदर करावा. कोणापुढे झुकू नये, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले.
राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने नवव्या ‘राजा परांजपे महोत्सवा’चे उद्घाटन आणि ‘राजा परांजपे सन्मान पुरस्कार’ वितरण खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते झाले; त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दिग्दर्शक राजेश मापुस्कर, अभिनेते संजय नार्वेकर, गायक अवधूत गुप्ते, अभिनेत्री निर्मिती सावंत यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर स्वाती यवलुजे प्रमुख उपस्थित होत्या. हा महोत्सव शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे.
राजा परांजपे महोत्सव यंदा कोल्हापूर नगरीत घेऊन कलेचा सन्मान केला आहे, असे खासदार संभाजीराजे म्हणाले.
महापौर स्वाती यवलुजे म्हणाल्या, कोल्हापूर हे कलेचे माहेरघर आहे. येथे अनेक कलाकारांनी कला जोपासण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. या कलेतूनच अनेक कलाकार निर्माण होऊन ते देशपातळीवर गाजत आहेत. राजा परांजपे प्रतिष्ठानचे अर्चना राणे आणि अजय राणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी राजा परांजपे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गुणीदास फौंडेशनचे शिरीष सप्रेही उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना अवधूत गुप्ते म्हणाले, कलेच्या नगरीत मिळणारा ‘राजा परांजपे पुरस्कार’ हा मला आॅस्करपेक्षाही मोठा सन्मान वाटतो. या पुरस्काराने आमची जबाबदारी वाढली असून, ती निभावण्याचा मी निश्चितच प्रयत्न करीन. संजय नार्वेकर म्हणाले, राजा परांजपे पुरस्काराने मला बळ मिळाले आहे. कोल्हापूरशी आणि येथील कलेशी आपले जुने नाते आहे.
राजेश मापूस्कर म्हणाले, राजा परांजपे पुरस्कार हा इतर पुरस्कारांपेक्षा मोठा सन्मान वाटतो.
माय मरो, मावशी जगो
निर्मिती सावंत यांनी कोल्हापूरचा ‘मावशी’ असा उल्लेख करताना ‘माय मरो, मावशी जगो’ अशा पातळीवर आपला कोल्हापूरशी संबंध असल्याचे सांगितले. याला प्रत्युत्तर देताना नार्वेकर यांनी, कोल्हापुरात कलेची कदर होते. मला माय-मावशी काही माहीत नाही; पण कोल्हापूर हे आमचे बाप आहे व आम्ही त्याची मुले आहोत; त्यामुळे कोल्हापूरच्या कलेने आम्हाला मुलाप्रमाणे सांभाळावे, अशी भावना व्यक्त केली.
कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात शनिवारपासून राजा परांजपे महोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी खासदार संभाजीराजे आणि महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते संजय नार्वेकर, अवधूत गुप्ते, निर्मिती सावंत, राजेश मापुस्कर यांना राजा परांजपे पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी अजय राणे, अर्चना राणे, शिरीष सप्रे उपस्थित होते.
आज महोत्सवात
चित्रपट : स. १० ते १२ वा.- जगाच्या पाठीवर
दु. १ ते ३ वा. - गंगेत घोडं न्हालं
नाटक : सायं. ५ ते ८ वा.- आम्ही मराठी (दोन अंकी नाटक)