अरुण डोंगळे भाजपच्या वाटेवर!
By admin | Published: January 24, 2017 11:13 PM2017-01-24T23:13:52+5:302017-01-24T23:13:52+5:30
दोन दिवसांत निर्णय : चंद्रकांतदादांसोबत झाली बैठक
आमजाई व्हरवडे : ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुणकुमार डोंगळे भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर डोंगळे यांची बैठक होऊन चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची पुन्हा बैठक होणार असून, भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते.
राधानगरी तालुक्यात ‘गोकुळ’च्या माध्यमातून डोंगळे यांचा मोठा गट सक्रिय आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक म्हणून डोंगळे यांच्याकडे पाहिले जाते. गोकुळच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून कार्यरत असले, तरी संपूर्ण राधानगरी व भुदरगड तालुक्यांत डोंगळे गटाची स्वतंत्र यंत्रणा सक्रिय आहे. डोंगळे यांच्या भाजप प्रवेशाने ‘भोगावती’च्या निवडणुकीत काँग्रेसला मोठी किंमत मोजावी लागणार हे निश्चित आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वीच ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर पाठोपाठ डोंगळे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने महाडिक समर्थक भाजपच्या वाटेवर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमध्येच राहून जिल्हा काँग्रेसचे पी. एन. पाटील यांच्याबरोबर त्यांचे कधीच सूत जुळले नाही. डोंगळे यांच्या पाठोपाठ तालुक्यातील अनेक नेते हातात कमळ घेण्याच्या तयारीत आहेत.
मी भाजपमध्ये येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आग्रही आहेत. त्यासाठी बैठकही झाली. सोमवारी माझी व त्यांची भेट झाली असून, आगामी ‘भोगावती’ व जि. प.च्या निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक होणार असून, या बैठकीतच भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल.
- अरुणकुमार डोंगळे