डोंगळेंची अति स्तुती नको; नाहीतर, तेच विधानसभेची उमेदवार असतील; मंत्री मुश्रीफ यांचा ‘केपीं’ना चिमटा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 01:16 PM2024-01-16T13:16:43+5:302024-01-16T13:19:28+5:30

‘गोकुळ’मध्ये अमृत कलश पूजन समारंभात नेत्यांनी चांगलीच फटकेबाजी केली

Arun Dongle will be the Assembly candidate; Minister Hasan Mushrif Pinch to KP Patil | डोंगळेंची अति स्तुती नको; नाहीतर, तेच विधानसभेची उमेदवार असतील; मंत्री मुश्रीफ यांचा ‘केपीं’ना चिमटा 

डोंगळेंची अति स्तुती नको; नाहीतर, तेच विधानसभेची उमेदवार असतील; मंत्री मुश्रीफ यांचा ‘केपीं’ना चिमटा 

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचा चेहरा सतत हसरा, ते कधी कोणत्या कामाला नाही म्हणत नाहीत आणि करीतही नाहीत. त्याच्या उलटे अरुण डोंगळे असून, ऑन दि स्पॉट जाऊन ते काम करतात. मंत्रीमंडळात अजित पवार आणि ‘गोकुळ’मध्ये डोंगळे असल्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले. हाच धागा पकडत, “डाेंगळेंची जास्त स्तुती करू नका; नाहीतर, तेच विधानसभेचे उमेदवार असतील,” असा चिमटा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढला.

‘गोकुळ’च्या १७ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल आयोजित अमृत कलश पूजन समारंभात नेत्यांनी चांगलीच फटकेबाजी केली.

आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत के. पी. पाटील म्हणाले, “दुधाचा ध्यास घेतलेला अध्यक्ष म्हणजे अरुण डोंगळे आहेत. ठिकपुर्ली येथे लम्पीच्या साथीवेळी आपण पोहोचायच्या अगोदर ते गोठ्यात पोहोचले होते. त्यांचे काम चांगले आहे; पण, त्यांना विनंती आहे. त्यांनी दुधातच काम करावे. त्या घाणीत (बिद्री साखर कारखाना) कशाला पडता? आमच्याकडे तेवढे येऊ नका.”
यावर, आमदार सतेज पाटील म्हणाले, के. पी. पाटील यांनी अरुण डोंगळे यांचे कौतुक केले, त्यामागे विधानसभेची पेरणी आहे. विनोदाचा भाग सोडला तरी पाटील यांनी देशात नंबर वन ऊस दर देण्याची भूमिका घेतल्याबद्दल कौतुकही केले.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, “मागील संचालक मंडळाने २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करणार म्हणून नोकरभरती केली. आता तुम्ही ३० लाख लिटर करणार म्हणून भरती करू नका.” यावर, “खासदारसाहेब, आम्ही सत्तेवर आल्यानंतर दीड-दोनशे रोजंदारी कर्मचारी कमी केले. आहे त्या कर्मचाऱ्यांमध्येच काम करीत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

‘के.पीं.’चा सत्कार मंडलिकांच्या हस्ते करा

बिद्री साखर कारखान्यातील विजयाबद्दल ‘गोकुळ’च्या वतीने के. पी. पाटील यांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येत असल्याचे निवेदकांनी सांगितले. त्यामध्ये हस्तक्षेप करीत खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते करा, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. मात्र, मंत्री मुश्रीफ यांनी हसतच पाटील यांचा सत्कार केला.

पॅन्टवाले आले आणि चुयेकरांची खुर्ची गेली

आनंदराव पाटील-चुयेकर हे १८ वर्षे ‘गोकुळ’चे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आपणाला मिळाली. जोपर्यंत फेटेवाले, कोटवाले, धोतर, विजार घालणारे होते, तोपर्यंत त्यांची खुर्ची शाबूत राहिली. मात्र, पॅन्टवाले आले आणि त्यांना पदावरून दूर व्हावे लागले, असा टोला ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी लगावला.

Web Title: Arun Dongle will be the Assembly candidate; Minister Hasan Mushrif Pinch to KP Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.