‘वहिनी’ निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का?, अरुण दुधवडकरांचा निवेदिता मानेंना सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 11:23 AM2022-01-10T11:23:06+5:302022-01-10T11:23:40+5:30
लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला.
कोल्हापूर : विधानसभेसह जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेसोबत होत्या, मागे वळून बघितल्यानंतर कधी पळून गेला हे समजले नाही. ‘आजरा’ कारखान्याला कर्ज देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजेत आणि लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला. ज्येष्ठ होता म्हणून शिवसेनेच्या पॅनलमध्ये लढण्याची विनंती केली होती, मात्र तीन जागा निवडून आल्यानंतर मी शिवसेनेचीच सांगत, वहिनीसाहेब निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का? असा प्रश्नही त्यांनी निवेदिता माने यांना केला.
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्जुन आबीटकर यांच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, आपल्यातील बेएकीमुळे विधानसभेत पराभव झाला. आगामी काळात दोन्ही कॉग्रेसच्या प्रलोभनांना बळी पडू नका, व्यासपीठावरील प्रत्येकाने एक प्रभाग सांभाळला तर ‘मनपा’वर शिवसेनेची सत्ता येईल.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास ‘उत्तर’ची पोटनिवडणूक लढवू. माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, दोन्ही कॉग्रेसचा शिवसेना डॅमेज करण्याचा प्रयत्न असून, आमचा मुख्यमंत्री आहे म्हणून किती सहन करायचे. आता कोणाला जवळ करु नका, संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची लढाई करायची आहे. आपल्याकडे विकास संस्था किती याचे गणित घालत बसू नका, प्रचार सुरु करा. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सत्यजित पाटील-सरुडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनील मोदी यांनी आभार मानले.
त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन माफी मागावी
बँकेच्या निवडणुकीत बाजूला गेलेल्यांनी पुन्हा यावे, असे सत्यजित पाटील यांनी सांगितले. वैभव उगले, कृष्णात पोवार म्हणाले, माफी मागायची असेल तर त्यांनी ‘मातोश्री’वर जावे.
‘क्रांतिसिंह’ थांबू नका, क्रांती होईल
पहिल्याच प्रयत्नात क्रांतिसिंह पवार यांनी विरोधकांना घाम फोडला. त्यांनी थांबू नये, एक दिवस क्रांती होईल, असे संजय पवार यांनी सांगितले.
रक्तातील शिवसेना गेली कोठे?
लोकसभा, विधानसभा आली की, ‘मातोश्री’चे उंबरे झिजवायचे, आमच्या रक्तात शिवसेना असल्याचे सांगायचे आणि गांधीबाबा दिसल्यानंतर वेगळी भूमिका घ्यायची. मग आता तुमच्या रक्तातील शिवसेना कोठे गेली, अशी विचारणा संजय पवार यांनी केली.