‘कुंभी’च्या रणांगणात अरुण नरके धर्मसंकटात
By Admin | Published: December 6, 2015 10:09 PM2015-12-06T22:09:38+5:302015-12-07T00:25:42+5:30
संदीप नरके आक्रमक : ‘एक व्यक्ती, एक पद’नुसार कारखान्याचे नेतृत्व देण्याची मागणी
प्रकाश पाटील -- कोपार्डे---‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची प्रतिमा जिल्ह्याच्या राजकारणात एक स्पोर्टी पॉलिटिकल म्हणून आहे. पराभवाला विजयात रूपांतर करण्याचा मोठा हातखंडा अरुण नरके यांचा असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. आपल्या घराण्यातील आमदार व्हावा, या महत्त्वाकांक्षेतून अरुण नरके यांनी पी. एन. पाटील यांच्याशी असलेल्या दोस्तीला तिलांजली देत पुतण्या चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी राहत २००९ मध्ये निवडणुकीत विजय मिळवून देत त्यांना विधानसभेत पाठविले. मात्र, सध्या कुंभी कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीप नरके यांनी आपल्याकडे नेतृत्व देण्याचे आव्हान करत अरुण नरके यांच्यापुढे धर्मसंकट उभे केले आहे. अरुण नरके यांनी आपल्या पत्नीच्या निधनानंतर सहकारी संस्था वगळता राष्ट्रीय राजकारणातून संन्यास घेतला. त्यांची जन्मभूमी असणाऱ्या पन्हाळा-बावडा विधानसभा मतदार संघात त्यांचे मामा यशवंत एकनाथ पाटील हे पाय रोवून असल्याने त्यांची आमदार होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही; पण आपल्या घराण्यातील एकतरी व्यक्ती आमदार झाली पाहिजे, ही महत्त्वाकांक्षा अरुण नरके यांनी करवीर विधानसभेच्या रिंगणात २००९ ला आपले पुतणे आमदार चंद्रदीप नरके यांना उतरवून पूर्ण केली. आ. चंद्रदीप नरके यांच्याकडे असणारी कष्टाची धार ओळखून अरुण नरके यांनी राजकीय बाळकडू दिले. यात आमदार नरके यांनीही जीव ओतून काम करत काकांच्या इच्छेला फळ दिले. आज आमदार नरकेंची आमदार म्हणून करवीर-पन्हाळा-गगनबावडा तालुक्यांत पकड असून, यातून कुंभी कारखान्याच्या गेल्या दोन पंचवार्षिक त्यांनी एकतर्फी जिंकल्या आहेत. मात्र, सध्या ‘कुंंभी’च्या निवडणूक पार्श्वभूमीवर अरुण नरके यांचे पुत्र संदीप नरके यांनी ‘एक व्यक्ती एक पद’ असा नारा देत आ. नरकेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. माझ्या आजोबांनी स्थापन केलेल्या कुंभी कारखान्यात आपण राजकारण विरहित काम करणार असून, तुम्ही पुढील राजकारण करा व मला कारखान्याचे नेतृत्व द्या, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. वडील अरुण नरकेंनाही त्यांनी आपल्या बरोबर रहावे यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत आ. नरकेंनी मौन पाळल्याने संदीप नरके हे विरोधकांच्या संपर्कात आहेत. विरोधकांतून संदीप नरके यांना मोठा विरोध आहे. जर संदीप नरकेंना बरोबर घेतले तर ताटात काय आणि वाटीत काय? अशीच अवस्था निर्माण होणार असल्याचे कट्टर नरके विरोधक उघड मत प्रदर्शन करत आहेत. मात्र, विरोधी गटातीलच एक गट आ. नरके यांना शह देण्यासाठी पन्हाळा तालुक्यात कमी पडणारी आपली ताकद वाढवायची असेल तर संदीप यांना बरोबर घ्या, अशी भूमिका मांडत आहे; मात्र हे करत असताना त्यांचे वडील अरुण नरके त्यांच्या बरोबर येत असतील तर? अशी अटही घालत आहेत. यासाठी विरोधी गटातील काही नेत्यांनी संदीप यांना आपण संधी देतो, तुम्ही आमच्या बरोबर या अशी गळही घातल्याचे वृत्त आहे. मात्र अरुण नरके यांनी याबाबत स्पष्ट नकार दिला असल्याचे वृत्त आहे.
पाठिंबा कोणाला : मुलगा की पुतण्या ?
गेल्याच महिन्यात वाकरे येथील एका कार्यक्रमात अरुण नरके यांनी आमदार नरके यांनी कुंभी कारखाना चांगला चालवलाय. उच्चांकी दर दिला आहे. सहवीज प्रकल्प डिस्टिलरी प्लँट कमी वेळात पूर्ण करत आ. नरके यांनी कारखाना आपल्या आजोबांच्या विचाराने चालवलाय, म्हणूनच आपण चंद्रदीपबरोबर कायम आहोत आणि राहणार, असे जाहीर केले होते.
आमदार चंद्रदीप नरकेंबरोबर असणारे अरुण नरकेंना मात्र संदीप नरकेंच्या आक्रमक विरोधी भूमिकेने सध्यातरी अस्वस्थ केले आहे. आपला मुलगा संदीप नरके जर वेगळी चूल मांडत असला तर त्याच्याबरोबर राहायचे की सहकार, राजकारणात कर्तृत्वाने पुढे आलेले पुतणे आमदार चंद्रदीप नरके यांच्याबरोबर राहायचे, याचे धर्मसंकट अरुण नरके यांच्यासमोर उभे ठाकले आहे.