घोड्यावरून येऊन अरुणा माळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 07:10 PM2019-04-03T19:10:40+5:302019-04-03T19:12:08+5:30
अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधत सजविलेल्या घोड्यावरून येऊन शक्तिप्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी बुधवारी दुपारी आपला
कोल्हापूर : अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधत सजविलेल्या घोड्यावरून येऊन शक्तिप्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी बुधवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उन्हाचा प्रचंड तडाखा असूनही हातात पक्षाचे निळ्या रंगाचे झेंडे खांद्यावर घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. हलगीचा कडकडाट, कैताळ व घुमक्याच्या वाद्यात ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली.
बिंदू चौकात महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचारयात्रेला प्रारंभ झाला. पिवळा फेटा, नऊवारी भगवी साडी नेसून हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली भारताची राज्यघटना हातात घेऊन उमेदवार डॉ. अरुणा माळी ह्या घोड्यावर स्वार होऊन प्रचारयात्रेत सहभागी झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी, डॉ. प्रकाश आंबेडकर व अरुणा माळी यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. यावेळी प्रचारप्रमुख डॉ. उदयसिंह देसाई, महिला आघाडीप्रमुख अस्मिता दिघे, डॉ. रेश्मा चव्हाण, डॉ. दीपाली जाधव, आदी सहभागी झाले होते.
डॉ. अरुणा माळी यांनी माजी आमदार लक्ष्मण माने, आघाडीचे जिल्हाध्यक्ष अस्लम मुल्ला, सरचिटणीस शाहीर शेख, लिंगायत मोर्चाचे अध्यक्ष सुनील गोटखिंडे, इम्रान सनदी यांच्यासोबत जाऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.