अरविंद इनामदार यांच्याकडून पोलीस दलामध्ये सुधारणा : अभिनव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 02:57 PM2019-11-13T14:57:10+5:302019-11-13T15:35:13+5:30
महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये सुधारणा करण्यामध्ये माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचा मोठा वाटा आहे. हे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी इनामदार यांना श्रद्धांजली वाहिली. ‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्या वतीने आयोजित शोकसभेत ते बोलत होते.
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये सुधारणा करण्यामध्ये माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचा मोठा वाटा आहे. हे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी इनामदार यांना श्रद्धांजली वाहिली. ‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्या वतीने आयोजित शोकसभेत ते बोलत होते.
प्रारंभी उपस्थितांनी इनामदार यांना आदरांजली वाहिली. डॉ. देशमुख म्हणाले, इनामदार यांनी पोलीस दलाच्या सुधारणेसाठी अविरत कष्ट घेतले. त्यांनी पोलिसांच्या कल्याणाची भूमिका घेतली. त्यांनी पोलीस नाईक, एपीआय ही पदे सुरू केली. पोलिसांच्या वेतनापासून ते त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत ते प्रचंड आग्रही होते.
‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे म्हणाले, पोलीस दलामध्ये काम करूनही असे संवेदनशील व्यक्तिमत्त्व दुर्मीळ असते. समाजातील सर्व थरांतील मान्यवर आणि सामान्य माणूस यांच्याशी त्यांनी नाते निर्माण केले होते. ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके म्हणाले, ‘इंडियन डेअरी असोसिएशनचा मी अध्यक्ष व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने मला प्रेरणा दिली. एक शिस्तबद्ध जीवन आम्ही जवळून पाहिले.’
रवींद्र उबेरॉय म्हणाले, जुनी हिंदी गीते ऐक ण्याची त्यांना आवड होती. हा जुना खजिना माझ्याकडे असल्याने त्यांनी कोल्हापुरात येण्याचे मान्य केले होते; परंतु ते आता शक्य नाही. गडहिंग्लज येथे एका कॉन्स्टेबलने त्यांना ‘घरी चहाला येता का?’ अशी विचारणा केली होती. तेव्हा दुसऱ्या दिवशी ते त्याच्या घरी पहिल्यांदा चहाला गेले. तसेच कुसुमाग्रजांना पोलीस अधिकाऱ्यांचा गणवेश घालायला लावला होता, अशा आठवणी राम देशपांडे यांनी सांगितल्या.
निवृत्त पोलीस उपअधीक्षक सतीश माने म्हणाले, नाशिक येथे प्रशिक्षण घेत असताना इनामदार आमचे प्राचार्य होते. कुमार गंधर्व यांच्या गाण्यापासून ते कुसुमाग्रजांच्या व्याख्यानांचे आयोजन करून त्यांनी आमच्यावर संस्कार केले.
जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल सुहास पोवार यांनीही त्यांच्या लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या भेटीची आठवण सांगितली. महेश धर्माधिकारी, रवींद्र जोशी, डॉ. शिवानंद गडद, प्रभाकर कुलकर्णी यांनीही यावेळी इनामदार यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या.
गडहिंग्लजचे श्रीकांत नाईक यांनी अमेरिकेतून पाठविलेल्या भावनाही यावेळी वाचून दाखविण्यात आल्या. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बाळ पाटणकर, रजनी हिरळीकर, उदय कुलकर्णी, दिलीप शिंदे उपस्थित होते.
आत्मचरित्र अपुरे
त्यांनी आत्मचरित्र लिहिण्यासाठी घेतले होते. आपल्या शेतावर निवांत राहून उर्वरित लेखन पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता. तसे त्यांनी आम्हांला सांगितले होते; परंतु त्यांच्या निधनाने तो योग आला नाही, अशी खंत यावेळी अरुण नरके आणि रवींद्र उबेरॉय यांनी बोलून दाखविली.