Kolhapur: ए.एस. ट्रेडर्स फसवणुकीतील संचालक महिलेस अटक, पोलिस अधीक्षकांकडून तपासाचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:47 AM2023-07-21T11:47:22+5:302023-07-21T11:47:47+5:30
गेल्या साडेसात महिन्यांत केवळ ४० कोटींपर्यंत फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांत दाखल
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या संचालक महिलेस आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि. २०) अटक केली. सुवर्णा श्रीरंग सरनाईक (वय ५७, रा. अंबाई टँक, रंकाळा, कोल्हापूर) असे अटकेतील महिलेचे नाव आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेऊन तपास गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.
गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये दाखल झाला. ए.एस. ट्रेडर्स कंपनीच्या २७ संचालकांपैकी केवळ एका संचालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. आता पुन्हा या गुन्ह्याचा तपास गतिमान झाला असून, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी दुपारी सुवर्णा सरनाईक या संचालक महिलेस रंकाळा परिसरातील अंबाई टँक येथील तिच्या राहत्या घरातून अटक केली.
ही महिला सुरुवातीला या कंपनीत एजंट म्हणून काम करीत होती. त्यानंतर तिची संचालक म्हणून वर्णी लागली. शेकडो गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक करण्यास तिने भाग पाडले होते. कंपनीच्या परदेश सहलींमध्येही तिचा सहभाग होता, अशी माहिती तपास अधिकारी निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी दिली.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याकडून ए.एस. ट्रेडर्स फसवणूक गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेतला. या गुन्ह्यातील जास्तीत जास्त संशयितांना तातडीने अटक करा, त्यांच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्या जप्त करा, कंपनीचा लाभ घेतलेल्या एजंटना आरोपी बनवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
तक्रारी करण्याचे आवाहन
गेल्या साडेसात महिन्यांत केवळ ४० कोटींपर्यंत फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आवश्यक कागदपत्रांसह त्यांच्या तक्रारी पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे नोंदवाव्यात, असे आवाहन उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी केले.
जामिनाचा आदेश रद्द
या गुन्ह्यातील २७ संशयितांपैकी विक्रम जोतिराम नाळे (रा. सांगरूळ, ता. करवीर) याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, फिर्यादी रोहित ओतारी यांनी संशयिताच्या जामिनावर आक्षेप घेऊन न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने नाळे याचा जामिनाचा आदेश रद्द केल्याची माहिती ए.एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीचे विश्वजित जाधव यांनी दिली.