सगळ्यांनी ठरवलंय म्हणून सरकार आलं, जितेंद्र आव्हाडांचा संजय राऊतांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 01:34 PM2022-05-30T13:34:29+5:302022-05-30T15:06:49+5:30
जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नाही.
कोल्हापूर : आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी बोलावे लागते. तरीही कोणी एकाने ठरवलंय म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले नाही, सगळ्यांनी ठरवले म्हणून आले. जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नसल्याचा पलटवार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर केला.
मंत्री आव्हाड रविवारी कोल्हापुरात आले असता, शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. मंत्री आव्हाड म्हणाले, ‘‘देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली, महागाईचा आगडोंब उडाला असताना त्यावर कोणीच बोलत नाही. मशिदीखाली मंदिर सापडले आणि मंदिराखाली मशीद सापडली, असे मुद्दामहून दगडावर दगडे घासून वणवा पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करून लोक बेधुंद अस्वस्थेत ठेवण्याचा प्रकार असून, रोज धर्माची पुडी सोडली जात आहे. आर्यन खानबाबत जे घडले त्याच्या मनात तपास यंत्रणेविषयी काय मत तयार झाले असेल, हेही जाणून घेतले पाहिजे.’’ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार राजीव आवळे आदी उपस्थित होते.
रामनाम म्हणण्याची वेळ आणू देऊ नका
महाराष्ट्राच्या राजकारणात धर्मांध शक्तीला रोखू शकणारे शरद पवार हे एकमेव नेते असल्यानेच त्यांच्यावर सातत्याने विरोधकांकडून हल्ले होत आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जशाच तसे उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन करत आम्ही राम म्हणू , पण आम्हाला रामनाम म्हणण्याची वेळ आणू देऊ नका, असा टोला मंत्री आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला.