मी कळायला अनेक जन्म लागतील, चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:38 AM2023-03-07T11:38:53+5:302023-03-07T12:18:18+5:30
मी कशातच अडकत नाही म्हणून विरोधक हैराण
कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून मी राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांसाठी मी कोठून पैसे आणतो, याची चौकशी विरोधक करत आहेत. त्यातूनच माझ्यावर शाई फेकण्याचा प्रकार झाला, तरीही मी कशात अडकत नाही म्हटल्यावर ते हैराण झाले आहेत. त्यातूनच ते माझ्यावर टीका करत आहेत, ठीक आहे, त्यातून त्यांना पुण्य मिळत असेल तर आणखी टीका करा, असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
मंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून दौलतनगर, कोल्हापूर येथे आयोजित मोफत फिरता दवाखान्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव, राहुल चिकोडे, नवोदिता घाटगे आदी उपस्थित होते.
मी कळायला तुम्हाला आणखी जन्म घ्यावा लागेल
पहाटे पाच वाजता माझे काम सुरू होते, कधी आजारी पडत नाही, नेहमी हसतखेळत असतो, याबद्दल विरोधकांना आश्चर्य वाटते. मात्र, मी कळायला तुम्हाला आणखी जन्म घ्यावा लागेल, असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला.
शेट्टी महायुतीसोबत येतील
‘स्वाभिमानी’ व ‘रासप’ हे महायुतीसोबत येणार असल्याबाबत विचारले असता, मंत्री पाटील म्हणाले, ‘रासप’ आमच्यासोबत आहेच, ‘स्वाभिमानी’ही होती. मध्यंतरीच्या काळात ते बाजूला गेले. तरीही राजू शेट्टी यांच्याशी आमचा संवाद असतोच, शेट्टी महायुतीसोबत येतील, याचा विश्वास आहे.
धनंजय महाडिक यांच्या मंत्रिपदाबाबत संकेत
माझ्या पदरात जे पुण्य गोळा होईल, त्यातील महेश जाधव, अशोक देसाई आदींना थोडे थोडे देत असतो. धनंजय महाडिक यांना राज्यसभा सदस्य केले, त्यांच्यासाठीही काही पुण्य अजून शिल्लक ठेवले असून, ते लवकरच दिसेल, अशा शब्दांत महाडिक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळेल, असे संकेत मंत्री पाटील यांनी दिले.
राऊत हिंमत असेल तर राजीनामा द्या
‘दादा हवा जोरात आहे टोपी सांभाळा’ अशी टीका संजय राऊत माझ्यावर करतात. मात्र, राऊत तुमच्या टोपीची काळजी करा, हिंमत असेल तर राजीनामा द्या, ज्या आमदारांच्या जिवावर खासदार झाला, त्यांना रोज शिव्याशाप देण्यापेक्षा राजीनामा देऊन पुन्हा राज्यसभेत जाऊनच दाखवा, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.
चिंचवडची जबाबदारी तुम्ही घेणार का?
कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसल्याने सगळेच विरोधक निराश झाले आहेत. त्यातून रोज त्रागा करत आहेत. कसब्यात यापूर्वीही झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. २००९ पासूनच्या तिन्ही निवडणुकीत विरोधातील उमेदवारांच्या मताची बेरीज भाजपपेक्षा अधिक होतीच, यावेळेला पराभवाच्या भीतीने घट्ट मिठी मारल्यानेच मत विभाजन टळले आणि विजयी झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. कसब्याची आम्ही जबाबदारी स्वीकारली तशी ‘चिंचवड’ची जबाबदारी विरोधक घेणार का, असा सवाल मंत्री पाटील यांनी केला.