कोश्यारींचा राजीनामा मंजूर केल्यामुळे कोल्हापुरात मविआकडून फटाके वाजवून आनंदोत्सव
By संदीप आडनाईक | Published: February 12, 2023 01:53 PM2023-02-12T13:53:18+5:302023-02-12T13:53:46+5:30
Kolhapur News: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यामुळे कोल्हापूरात नाथा गोळे तालमीजवळील सुप्रभा मंच कार्यालयात महाविकास आघाडीने रविवारी बोलावलेल्या बैठकीत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
- संदीप आडनाईक
कोल्हापूर - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यामुळे कोल्हापूरात नाथा गोळे तालमीजवळील सुप्रभा मंच कार्यालयात महाविकास आघाडीने रविवारी बोलावलेल्या बैठकीत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी, दीक्षांत समारंभादिवशी शिवाजी विद्यापीठात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल कोश्यारी यांना विद्यापीठाने दीक्षांत समारंभासाठी निमंत्रित केले होते. त्याचा आघाडीच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी नाथा गोळे तालमीजवळ बोलावलेल्या व्यापक बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवभक्त लोकआंदोलन समितीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रास्तविक केले. भगतसिंग कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा घेतला गेल्याने या आंदोलनाला यश मिळाल्याचे चव्हाण म्हणाले. शिवाजीराव परुळेकर म्हणाले, शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर असलेल्या व्यक्तीने राज्यपालांना बोलावणे हे चुकीचे आहे. आता कुलगुरुंनाही हाकलले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि सर्वपक्षीय समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, कोल्हापूरकरांनी एकत्र येउन कोश्यारी यांना त्यांची योग्य जागा दाखवली. ठरल्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठात सकाळी ११ वाजता सर्व कार्यकर्ते एकत्र येउन शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि कुलगुरुंना जाब विचारतील.
शिवभक्त लोकआंदोलन समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक म्हणाले, सुंठेवाचून खाेकला गेला आणि, औषधाविना खरुज गेली आहे. आता विद्यापीठात आनंदोत्सव साजरा करु. या बैठकीला गुलाबराव घोरपडे, विक्रम जरग, अशोकराव भंडारे, संपतराव चव्हाण, उदय पोवार, दुर्वास कदम, कादर मलबारी, रफिक शेख, अमर देसाई, निरंजन कदम, विजय केसरकर, वाहिदा मुजावर, लीला धुमाळ, वैशाली महाडिक, हेमलता माने आदी उपस्थित होते.
फटाके वाजवून आनंदोत्सव
यावेळी नाथा गोळे तालमीसमोर फटाके वाजवून राज्यपाल काेश्यारी यांच्या राजीनाम्याचा आनंदोत्सव साजरा केला. शिवाजी महाराज की जय, कोश्यारी मुर्दाबाद, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात येत होता. यादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.