शेतकरी सोबत आहेत, तोपर्यंत अशा दहा लोकसभा ओवाळून टाकू - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 12:12 PM2022-04-06T12:12:20+5:302022-04-06T12:13:01+5:30
पेन्शनवर चळवळ चालवणे अवघड झाले आहे. हे ओळखून शेतकऱ्यांनी पैसे दिले, माझी झोळी अजून फाटलेली नाही, ती पवित्र आहे. झोळीतील दान वाया जाऊ देणार नाही, त्यातील एक रुपयाही इतरत्र खर्च होणार नाही, असा भावनिक टचही शेट्टी यांनी शेवटी दिला.
कोल्हापूर : महाविकास आघाडीशी फारकत घेतली म्हणून आता लोकसभेचे काय होणार? अशी काहींना चिंता आहे, मात्र राज्यातील शेतकरी जोपर्यंत माझ्या मागे आहेत, तोपर्यंत अशा दहा लोकसभा ओवाळून टाकू, असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. आता नव्याने शून्यापासून सुरुवात करायची आहे, नवा हुंकार घेऊन महाराष्ट्र पिंजून काढत संघटनेची बांधणी भक्कम करू आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांची ताकद राज्यकर्त्यांना दाखवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.
संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक चोकाक (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी झाली, त्यामध्ये शेट्टी यांनी महाविकास आघाडीसह भाजपवर निशाणा साधला. शेट्टी म्हणाले, महायुती व महाआघाडीसोबत स्वत:हून गेलो नाही. गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी यांनी महायुतीत घेतले, तर शरद पवार यांच्या विनंतीनुसारच आघाडीसोबत आलो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील, या आशेपोटी दोघांशी मैत्री केली, मात्र दोघांनीही विश्वासघाताचे राजकारण केले.
राजकीय सोयीसाठी चळवळ नाही, हे मान्य करतो. काहीवेळा मी भूमिका बदलल्या, शेतकऱ्यांना चार पैसे फायदा होईल, यासाठी हा प्रयत्न होता. कर्जमाफी वगळता राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले. पीक विम्याच्या माध्यमातून विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत. महागाईच्या आगडोंबामुळे सामान्य माणूस अस्वस्थ असताना त्याचे केंद्र सरकारला देणे-घेणे पडलेले नाही. यासाठी केंद्राच्या धोरणांची यापुढे चिरफाड करणार आहे. एफआरपीचे तुकडे पाडणार असाल, तर उद्याच्या हंगामात साखर कारखानदार व संघटनेमध्ये संघर्ष अटळ आहे. हे करत असतानाच संघटनेचा राज्याबाहेर विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘ईडी’ला विमा कंपन्यांचा घोटाळा दिसत नाही का?
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना २२ हजार कोटींचा चुना लावला आहे. खोटे रेकॉर्ड करून विमा नाकारला जातो, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मग हे ईडीला का दिसत नाही? असा सवाल शेट्टी यांनी केला.
चळवळीतून विश्रांती घ्या, पण खो घालू नका
चळवळीतील काहींना आता धगधग सोसवत नाही. दहा-वीस वर्षे काम केल्याने विश्रांती घ्यावी लागते. त्यांचा सन्मान कायम राहील, त्यांनी विश्रांती घ्यावी, पण चळवळीला खो घालण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दात पदाधिकाऱ्यांचे शेट्टींनी कान टोचले.
शेट्टींना गाडीसाठी १०.४५ लाखांची मदत
संघटनेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत शेतकऱ्यांनी वर्गणी काढून २००२ मध्ये गाडी घेऊन दिली. त्यानंतर दोन गाड्या मी घेतल्या. त्यावेळी मला पगार सुरू असल्याने हात पसरण्याची वेळ आली नाही. आता उत्पन्न कमी झाले असून, पेन्शनवर चळवळ चालवणे अवघड झाले आहे. हे ओळखून शेतकऱ्यांनी पैसे दिले, माझी झोळी अजून फाटलेली नाही, ती पवित्र आहे. झोळीतील दान वाया जाऊ देणार नाही, त्यातील एक रुपयाही इतरत्र खर्च होणार नाही, असा भावनिक टचही शेट्टी यांनी शेवटी दिला.