कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २४५८ मालमत्ता जमीनदोस्त, २०२१ च्या तुलनेत पाऊस कमी पण पडझड जास्त

By राजाराम लोंढे | Published: July 31, 2024 06:29 PM2024-07-31T18:29:05+5:302024-07-31T18:29:24+5:30

आतापर्यंत सरासरी ९५६ मिलीमीटर : शाहूवाडी, भुदरगडमध्ये मात्र यंदा अधिक पाऊस

As many as 2458 properties are landlocked in Kolhapur district, rain less than 2021 but fall more | कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २४५८ मालमत्ता जमीनदोस्त, २०२१ च्या तुलनेत पाऊस कमी पण पडझड जास्त

कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २४५८ मालमत्ता जमीनदोस्त, २०२१ च्या तुलनेत पाऊस कमी पण पडझड जास्त

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जुलै महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळल्याने महापुराचे संकट आले होते. आतापर्यंत सरासरी ९५६ मिलीमीटर पाऊस झाला असला तरी २०२१ च्या तुलनेत पाऊस कमीच आहे. हे जरी खरे असले तरी पडझड २४५८ मालमत्तांची झाली असून २०२१ पेक्षा तब्बल २७७ मालमत्ता अधिक आहेत. शाहूवाडी व भुदरगड तालुक्यात तुलनेत यंदा अधिक पाऊस झाला आहे.

यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असली तरी जून महिन्यात पाऊस कमी झाला. जुलैमध्ये पावसाने सुरुवात केली, मात्र पावसाने १० जुलैपासून खरी सुरुवात केली. त्यातही गेल्या आठ-दहा दिवसांत जिल्ह्यात धुवाधार पाऊस काेसळला. सगळीकडे पाणी पाणी झाले तर पंचगंगेने ४८ फुटाची पातळी गाठल्याने कोल्हापूरकरांना २०१९ व २०२१ च्या महापुराची आठवण होऊन चिंता वाढली होती. पावसाचा जोर वाढत जाईल, तशी धाकधूक वाढली होती.

पण, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जून महिन्यात सरासरी जेमतेम १९९ मिलीमीटर झाला होता. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात २६१ मिलीमीटर पाऊस झाला. मात्र, १५ जुलैनंतर जोरदार पाऊस कोसळल्याने या पंधरा दिवसात तब्बल ५०० मिलीमीटर पाऊस पडल्याने महापूर आला.

पण, हा महापूर २०२१ च्या तुलनेत कमी होता. जुलै अखेर जिल्ह्याची सरासरी १०२६ मिलीमीटर आहे, त्यापैकी जुलै २०२१ पर्यंत ११२९ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ९५६ मिलीमीटर झाला आहे. जिल्ह्याचा पाऊस कमी असला तरी शाहूवाडी व भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.

गेल्या पाच वर्षात जुलै अखेर अशी झाली पडझड

वर्ष - मालमत्ता - नुकसान
२०२० - १२५  -  ४५.९९ लाख
२०२१ - २१८१ -  १०.३३ कोटी
२०२२ - ३३९  -  १.०४ कोटी
२०२३ - ३७०  - १.२० कोटी
२०२४ - २४५८   -  ८.४२ कोटी

तुलनात्मक पाऊस, मिलीमीटरमध्ये असा
वर्ष         सरासरी पाऊस  जुलैपर्यंतची टक्केवारी

२०२०         ३६५                 ५५
२०२१         ११२९                ११६
२०२२         ६४२                 ६२
२०२३         ६८४                 ६६
२०२४          ९५६                ९३

यंदा असा झाला पंधरवड्यात पाऊस, मिलीमीटरमध्ये
कालावधी  -  सरासरी पाऊस

१ ते १५ जून - ८२.५
१६ ते ३० जून - ११७.१
१ ते १५ जूलै - २६१.०
१६ ते ३० जुलै - ५००.०

Web Title: As many as 2458 properties are landlocked in Kolhapur district, rain less than 2021 but fall more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.