विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्या दिवशी २५३ अर्ज नेले, कुणीच नाही भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:52 PM2024-10-23T12:52:54+5:302024-10-23T12:54:08+5:30

कोल्हापूर : विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतून पहिल्या दिवशी तब्बल २५३ अर्ज नेण्यात आले आहेत. परंतु तो अतिशय बारकाईने भरावा ...

As many as 253 applications were taken from Kolhapur district on the first day for the assembly | विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्या दिवशी २५३ अर्ज नेले, कुणीच नाही भरले

विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्या दिवशी २५३ अर्ज नेले, कुणीच नाही भरले

कोल्हापूर : विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतून पहिल्या दिवशी तब्बल २५३ अर्ज नेण्यात आले आहेत. परंतु तो अतिशय बारकाईने भरावा लागत असल्याने पहिल्या दिवशी कुणीच अर्ज भरलेला नाही. बहुतांशी ठिकाणी आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अर्ज नेले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २९ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. उमेदवारी अर्ज मोफत दिला जातो.

जरी ही मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत असली तरीही दि. २६ आणि २७ ऑक्टोबर या दिवशी शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्याने या दिवशी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. अर्ज नेल्यानंतर त्याचे विविध रकाने भरणे, त्याला आवश्यक कागदपत्रे जोडणे, उत्पन्नाची माहिती जोडणे यासाठी वेळ लागत असल्याने गुरुवारपासून अर्ज दाखल करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

कोल्हापूर उत्तरमधून १७ जणांनी २२ अर्ज नेले आहेत. तर कोल्हापूर दक्षिणमधून १९ जणांनी तब्बल ५७ अर्ज नेले आहेत. शिरोळ मतदारसंघासाठी ३ जणांनी १८ अर्ज नेले आहेत. यामध्ये विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासाठी सर्वाधिक अर्ज नेण्यात आले आहेत. चंदगड मतदारसंघातून १८ जणांनी ४४ अर्ज नेण्यात आले आहेत. यात विद्यमान आमदार राजेश पाटील, शिवाजीराव पाटील, नंदिनी बाभूळकर, गोपाळराव पाटील, अप्पी पाटील यांच्यासाठी अर्ज नेले आहेत.

हातकणंगलेसाठी ९ अर्ज नेण्यात आले आहेत. तर राधानगरीसाठी २७ अर्ज नेले आहेत. कागलसाठी ११ जणांनी २१ अर्ज नेले असून, यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, नवीद मुश्रीफ, समरजित घाटगे, नवोदिता घाटगे या प्रमुखांसाठी अर्ज नेण्यात आले आहेत.

इचलकरंजीसाठी २० जणांनी ३६ अर्ज नेले असून, यामध्ये आवाडे यांच्या घरातील राहुल, मौसमी आवाडे यांच्यासाठी २० अर्ज नेण्यात आले आहेत. शाहूवाडी मतदारसंघासाठी ७ अर्ज नेण्यात आले आहेत. तर करवीर मतदारसंघासाठी ९ जणांनी १२ अर्ज नेले आहेत.

इचलकरंजीत राष्ट्रवादीच्या चोपडे यांनी नेला अर्ज

इचलकरंजी मतदारसंघातून भाजपकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तरीही महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी अर्ज नेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय नेलेले अर्ज

कोल्हापूर दक्षिण ५७, चंदगड ४४, इचलकरंजी ३६, राधानगरी २७, कोल्हापूर उत्तर २२, कागल २१, शिरोळ १८, करवीर १२, हातकणंगले ०९, शाहूवाडी ०७

Web Title: As many as 253 applications were taken from Kolhapur district on the first day for the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.