‘साहित्य अकादमी’चे पान, कोल्हापूरच्या लेखकांनीच मिरवला सर्वाधिक मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 01:00 PM2023-12-21T13:00:50+5:302023-12-21T13:01:14+5:30

कोल्हापूरच्या याच रांगड्या भाषेने मराठी साहित्य विश्वातही मोलाची भर घातली

As many as eight Sahitya Akademi awards in Marathi literature have been won by writers of Kolhapur district | ‘साहित्य अकादमी’चे पान, कोल्हापूरच्या लेखकांनीच मिरवला सर्वाधिक मान

‘साहित्य अकादमी’चे पान, कोल्हापूरच्या लेखकांनीच मिरवला सर्वाधिक मान

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की दुधाची, कुस्तीची पंढरी... नद्यांचा सुपीक प्रदेश असलेल्या या तांबड्या मातीत रानाला इंगळी डसावी असे तर्रारून आलेले उसाचे फड हीच या मातीची सांगितली जाणारी ओळख. पण, कोल्हापूरच्या याच रांगड्या भाषेने मराठी साहित्य विश्वातही मोलाची भर घातली आहे. मराठी साहित्यातले तब्बल आठ मानाचे साहित्य अकादमी पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यकांनी पटकाविले आहेत. 

राज्यात इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. वि. स. खांडेकर यांच्यापासून ते बुधवारी जाहीर झालेल्या कृष्णात खोत यांच्यापर्यंतचा साहित्य अकादमीचा हा प्रवास कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्याला सुवर्णझळाळी देणारा ठरला आहे. विशेष म्हणजे एक अपवाद वगळता जिल्ह्यातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांना त्यांच्या कादंबरी याच साहित्यप्रकाराला हा पुरस्कार मिळाला आहे.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक

वर्ष - लेखकाचे नाव - साहित्यकृतीचे नाव
१९६० - वि. स. खांडेकर - ययाती
१९६४ - रणजित देसाई - स्वामी
१९९० - आनंद यादव - झोंबी
१९९२ - विश्वास पाटील - झाडाझडती
२००१- राजन गवस - तणकट
२००७ - गो. मा. पवार - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चरित्र)
२०२१- किरण गुरव - बाळूच्या अवस्थंतराची डायरी
२०२३ - कृष्णात खोत - रिंगाण

शांतीनाथ देसाई यांनाही पुरस्कार

शिवाजी विद्यापीठात कार्यरत असलेले शांतीनाथ देसाई यांच्या ‘ओम नमो ओम’ या कन्नड भाषेतील कादंबरीला २००० साली मरणोत्तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तर अर्धे आयुष्य कोल्हापुरात व्यतीत केलेल्या विजया राजाध्यक्ष यांना १९९३ साली ‘मर्ढेकरांची कविता’ या समीक्षाला साहित्य अकादमी मिळाला होता.

माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील अंतरंग उलगडणारी मराठी साहित्यातील रिंगाण ही उत्तमातील उत्तम कादंबरी आहे. तिला पुरस्कार मिळणे अपेक्षित होतेच. कृष्णात खोत यांचे अभिनंदन. - राजन गवस, ज्येष्ठ लेखक.
 

कृष्णात खोत यांनी धरणग्रस्तांचे नवे भावविश्व वेगळ्या पद्धतीने मांडले आहे. त्यांच्या कादंबरीला मिळालेला हा पुरस्कार कोल्हापूरच्या साहित्यक्षेत्राचा गौरव आहे. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रसिद्ध समीक्षक.

Web Title: As many as eight Sahitya Akademi awards in Marathi literature have been won by writers of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.