बाळूमामा देवस्थानचा भ्रष्टाचार वेशीवर टांगला, ‘धर्मादाय’ला का बरं झोंबला?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 12:13 PM2023-11-01T12:13:03+5:302023-11-01T12:13:34+5:30
दबाव टाकण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : श्री बाळूमामा देवालय ट्रस्ट, आदमापूर (ता. भुदरगड) येथील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असताना धर्मादाय उपायुक्त कार्यालयाला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत! गेल्या दोन दिवसांपासून न्यायालयातील खटल्याचे कारण सांगून, कोणाच्या परवानगीने बातम्या प्रसिद्ध करत आहात? अशा स्वरूपाचा दबाव आणला जात आहे.
ज्या ट्रस्टशी संबंधित हे प्रकरण आहे, त्याचे विद्यमान व माजी पदाधिकारी जे प्रसिद्ध होत आहे, त्याबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत आणि धर्मादाय उपायुक्त कार्यालय मात्र वारंवार आक्षेप घेत आहे. मग त्यांना हा भ्रष्टाचार सुरू राहावा किंवा त्यावर पांघरूण घालावे, असे का वाटत आहे, हेच खरे गौडबंगाल आहे ! या ट्रस्टचा कारभार एवढा स्वच्छच आहे, तर मग धर्मादाय कार्यालयानेच त्यावर प्रशासक का नेमला आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनीच देण्याची गरज आहे.
सर्वसामान्य भक्तांची श्रद्धा ज्यांच्या चरणांशी येऊन थांबते, त्या श्री बाळूमामा देवालयात गेल्या २० वर्षांत झालेल्या भ्रष्टाचारावर आधारित मालिका ‘लोकमत’मध्ये सोमवार (दि. ३०) पासून सुरू झाली आहे. ती सुरू झाल्यावर धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडून चौकशीला येण्यासाठी सांगण्यात आले. या प्रकरणी उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अशा बातम्या प्रसिद्ध करणे हा न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, याची त्यांनी लेखी पत्राद्वारे आठवण करून दिली.
न्यायालयात खटला दाखल असतानाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभाराबद्दल अशा बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या आहेत आणि न्यायालयात खटला सुरू असताना त्यासंबंधीच्या बातम्या देऊ नयेत, असा कायदा नाही. मंगळवारी कार्यालयातील कुणीतरी निरीक्षक असलेल्या रागिणी खडके यांनी ‘तुम्ही कागदपत्रे कोणाकडून घेतली, कोणाच्या परवानगीने बातम्या छापता?’ अशा उद्धट भाषेत संवाद साधला.
तक्रारीनंतरच कारवाई
बाळूमामा देवालयातील भ्रष्टाचारविरोधात ‘धर्मादाय’कडे तक्रारी झाल्यानंतर निरीक्षक, अधीक्षकांनी चौकशी अहवाल सादर केले. सहायक धर्मादाय आयुक्त वर्ग १ यांनी या सगळ्या प्रकरणांवर ताशेरे ओढत, स्वत:हून ४१ ड अंतर्गत स्वयंखुद्द कारवाई प्रस्तावित केली. त्यानंतर धर्मादाय सहआयुक्तांनी ट्रस्टच्या बरखास्तीचा निर्णय दिला. ही सगळी कारवाई धर्मादाय कार्यालयांतर्गतच झाली आहे.
नाईकवाडेंना थांबवले... खडकेंना पाठवले
‘बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला’ या वृत्तमालिकेचा सोमवारी ‘लोकमत’मध्ये पहिला भाग प्रसिद्ध होताच देवालयाचे प्रशासक शिवराज नाईकवाडे यांना आदमापूरला जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांना कार्यालयातच थांबण्यास सांगण्यात आल्याचे समजते. ‘लोकमत’ला माहिती कशी मिळाली, याचा छडा लावण्यासाठी खडके यांना आदमापूरला पाठवले.
रुपयालाही घामाचा वास..
बाळूमामांचे सारे भक्त अत्यंत कष्टकरी समाजातील आहेत. तिथे येणारा कोणीही भक्त धनदांडगा नाही. त्याने घामाच्या स्वकमाईतील रक्कम बाळूमामांच्या चरणी श्रद्धेने वाहिली आहे. त्यातूनच या देवालयाचा कारभार चालतो. त्यावर देवाचे नाव घेत कोणी डल्ला मारणार असेल तर ते संतापजनकच आहे. तिथे गैरकारभार सुरू आहे अशी चर्चा होती; परंतु नेमके काही समजत नव्हते. ‘लोकमत’ने त्याचा पर्दाफाश केला, ते चांगलेच झाले, अशाच प्रतिक्रिया गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत’कडे येत आहेत. गैरव्यवहारांबद्दलची माहितीही ‘लोकमत’कडे येत आहे.