LokSabha2024: कोल्हापुरात किरकोळ वाद, तणाव वगळता शांततेत मतदान; पोलिसांनी सोडला नि:श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 01:15 PM2024-05-08T13:15:28+5:302024-05-08T13:21:24+5:30
अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद आणि घोषणाबाजीचे प्रसंग घडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी काही ठिकाणी भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. दरम्यान, सलग बंदोबस्तांमुळे त्रासलेल्या पोलिसांनी मतदान संपताच नि:श्वास सोडला.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात एक पोलिस अधीक्षक, दोन अपर पोलिस अधीक्षक, सहा उपअधीक्षक, २१ पोलिस निरीक्षक, १९४ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्यासह ४७३५ पोलिस कॉन्स्टेबल, ३ हजार होमगार्ड, केंद्रीय राखीव दलाच्या तीन तुकड्या, राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्यांनी परिश्रम घेतले. राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी शहरातील सदर बाजार, कदमवाडी, भोसलेवाडी यासह वडणगे (ता. करवीर) येथील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनीही शहरासह जिल्ह्यातील मतदार केंद्रांची पाहणी करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना केंद्रापासून १०० मीटरच्या बाहेर थांबण्याच्या सूचना दिल्या.
लाइन बाजार येथे महासैनिक दरबार ट्रेनिंग सेंटरबाहेर शिवसेना आणि काँग्रेसचे बूथ जवळच होते. घोषणा देण्याच्या कारणावरून दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला. सदर बाजार येथे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. याच ठिकाणी उशिरा आलेल्या काही मतदारांना मतदान करता आले नाही. यावरूनही मतदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाला. अखेर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.
गोपनीयतेचा भंग
मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास परवानगी नसतानाही काही मतदारांनी कर्मचारी आणि पोलिसांची नजर चुकवून मोबाइलवर मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करून गोपनीयतेचा भंग केला. काही जणांनी तर व्हॉट्सॲप स्टेटसला व्हिडीओ लावून आपले मत जाहीर केले. याबाबत संबंधितांना नोटिसा पाठवणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.