मुलांना एकच आधार, मुलगी चालेल निराधार; महिला आधारगृहाकडे वरपित्यांची लागली रिघ
By विश्वास पाटील | Updated: March 22, 2025 13:42 IST2025-03-22T13:39:29+5:302025-03-22T13:42:38+5:30
लुबाडणुकीचाही प्रकार आला समोर

मुलांना एकच आधार, मुलगी चालेल निराधार; महिला आधारगृहाकडे वरपित्यांची लागली रिघ
विश्वास पाटील
कोल्हापूर : लग्नासाठी मुली मिळत नसल्याने राज्यभरातील शासनाच्या महिला आधारगृहांकडे लग्नासाठी मुलगी हवी म्हणून बायोडेटांची थप्पी लागत आहे. अनेक पालक या संस्थांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु, हल्ली संस्थांतील विवाहयोग्य मुलींचे प्रमाण कमी झाल्याने तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. यातून लग्नासाठी मुली मिळवण्यातील भीषण समाजवास्तव पुढे येत आहे.
राज्यभरात शासन अनुदानित प्रत्येक जिल्ह्यात दोन तरी महिला आधारगृहे आहेत. त्यातून मुलींचे शिक्षणाने, विवाहाने पुनर्वसन करून दिले जाते. त्यामुळे तिथे अनाथ, निराधार मुली लग्नासाठी सहज उपलब्ध होतील, असा समज करून पालकांनी अशा संस्थांकडे मोर्चा वळवला आहे. या संस्थांतील मुलींच्या विवाहाची शासनाने एक पध्दती निश्चित करून दिली आहे.
मुलाचे वय जास्तीत जास्त २८ असेल तरच त्याचा बायोडेटा स्वीकारला जातो. लग्नात मुलीच्या पसंतीला महत्व असते. त्यांच्या एचआयव्हीपासून सर्व आरोग्य तपासण्या कराव्या लागतात. आर्थिक स्थितीची तपासणी केली जाते. शेतकरी, छोटे व्यावसायिक, कमी उत्पन्न गटातील सर्व जातीतील पालक अगोदर पै-पाहुण्यांतून, ओळखीतून मुली शोधतात आणि कुठेच मुलगी मिळाली नाही की मग संस्थेतील मुलगी हवी म्हणून येतात. परंतु, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.
या संस्थांमध्ये अनाथ, निराधार मुली येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. लहान वयातच दत्तकप्रक्रिया होत असल्याने लग्नापर्यंत मुली राहात नाहीत. संस्थेतील मुली निराधार असल्याने त्या सहज लग्नाला तयार होतील, अशी समाजधारणा असते, त्याचा गैरफायदाही घेतला जात आहे. शासनाच्या शाहूवाडीतील महिला आश्रमातील मुलीचे लग्न करायचे आहे, अशी जाहिरात सोशल मीडियावर गेले काही दिवस व्हायरल झाली आहे.
त्यात एका सुंदर मुलीचा फोटो वापरला आहे. तो पाहून कोणतीही माहिती न घेताच पालकांनी, विवाहइच्छूक तरुणांनी पाच हजारांपासून ते दीड लाखांपर्यंतची रक्कम ऑनलाइन पाठवली आहे. कित्येक लाखांची त्यातून लुबाडणूक झाली आहे. गंमत म्हणजे शासनाची शाहूवाडी तालुक्यात अशी कोणतीच संस्था नाही.
संस्थेतील मुलींचे विवाहाने पुनर्वसन होत आहे, ही चांगलीच बाब आहे. परंतु, राज्य पुरुषगृहातील मुलांचा विवाह हा विषय समाजाच्याच काय शासनाच्याही ध्यानीमनी अजून आलेला नाही. त्यांना शासनाने वाऱ्यावरच सोडले आहे. त्यांच्या पालकत्त्वाची भूमिका आपण घेतली पाहिजे. - डॉ. सुनीलकुमार लवटे
आमच्या संस्थेतून वर्षातून एक किंवा दोन मुलींचीच लग्न होतात. परंतु, त्यासाठी रोज किमान दोन बायोडेटा येतात. आठ ते दहा पालक आमच्या मुलासाठी मुलगी आहे का म्हणून चौकशी करायला संस्थेत येत आहेत. आमच्या संस्थेतून आतापर्यंत ७४ मुलींची लग्ने झाली असून, त्या सुखी संसार करत आहेत. - पद्मा तिवले मानद कार्यवाह, बालकल्याण संकुल, कोल्हापूर