ए.एस. ट्रेडर्सकडून गडहिंग्लज परिसरात ३६ कोटींचा गंडा, गुंतवणूकदारांनी पोस्टाने केली पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 02:31 PM2023-03-24T14:31:40+5:302023-03-24T14:32:02+5:30

पोलिसांचा नेमका उद्देश काय?

A.S. traders 36 crores extortion from in Gadhinglaj area, investors have lodged a complaint with the kolhapur Superintendent of Police by post | ए.एस. ट्रेडर्सकडून गडहिंग्लज परिसरात ३६ कोटींचा गंडा, गुंतवणूकदारांनी पोस्टाने केली पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

ए.एस. ट्रेडर्सकडून गडहिंग्लज परिसरात ३६ कोटींचा गंडा, गुंतवणूकदारांनी पोस्टाने केली पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

googlenewsNext

कोल्हापूर : आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ए.एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांनी गडहिंग्लज परिसरातील १,३१० गुंतवणूकदारांची ३६ कोटी २६ लाख ८८ हजार ८८८ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदारांंनी केली आहे. गडहिंग्लज पोलिस आणि विभागीय उपअधीक्षक पोलिस कार्यालयाने फिर्याद स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याने अखेर गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षकांसह गडहिंग्लज पोलिसांना पोस्टाद्वारे तक्रार पाठवली.

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ए.एस. ट्रेडर्स कंपनीच्या विरोधात तक्रारींचा ओढ वाढत आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता गडहिंग्लज परिसरातील १,३१० गुंतवणूकदार कंपनीच्या विरोधात एकवटले आहेत.

डिसेंबर २०१७ ते ऑगस्ट २०२२ या कालावधित कोल्हापुरातील काही नामांकित हॉटेल्समध्ये सेमिनारचे आयोजन करून कंपनीच्या संचालकांनी लोकांना गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. गुंतवणुकीवर आकर्षक परताव्यासह परदेश सहल, चारचाकी वाहन, महागड्या वस्तूंचे आमिष दाखवले. त्यातून कोट्यवधी रुपयांची माया जमा केली. मात्र, सप्टेंबर २०२२ पासून परतावे बंद झालेत, तसेच मूळ रक्कमही अडकून पडल्याने गुंतवणूकदार कंपनीच्या संचालकांचा शोध घेत आहेत.

गुंतवणूकदार हवालदिल

गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड परिसरातील नोकरदार, व्यावसायिक, डॉक्टर्स, शेतकरी, शिक्षक अशा अनेकांनी जादा परताव्याच्या आमिषाने ए.एस. ट्रेडर्सच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत. एजंटनी त्यांचे मित्र, नातेवाईक, पै-पाहुणे यांनाही मोठ्या रकमा गुंतवण्यास भाग पाडले. सेवानिवृत्त झालेल्या अनेकांनी फंडाची लाखो रुपयांची रक्कम यात गुंतवली. आता परतावा तर नाहीच; पण मूळ रक्कमही अडकल्यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत, तर एजंटकडे गुंतवणूकदारांचा तगादा सुरू आहे.

आयजींच्या सूचना, तरीही दुर्लक्ष

ए.एस. ट्रेडर्सविरोधी कृती समितीने विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेऊन तक्रारी दाखल करून घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आयजी फुलारी यांनी सर्व पोलिस ठाण्यांना तक्रारी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही पोलिसांकडून गुंतवणूकदारांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलिसांचा नेमका उद्देश काय?

फसवणुकीच्या विरोधात एकवटलेल्या गुंतवणूकदारांनी २ मार्चला गडहिंग्लज पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. मात्र, त्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. याबाबत २१ मार्चला गुंतवणूकदार गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांना भेटले. त्यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल असल्याचे सांगत फिर्याद घेतली नाही. त्यानंतर गुंतवणूकदार विभागीय उपअधीक्षक कार्यालयात पोहोचले. तिथेही पोलिसांनी तक्रार अर्ज स्वीकारला नाही. अखेर गुंतवणूकदारांना पोस्टाद्वारे अर्ज पाठवावा लागला. यावर काहीच कारवाई झाली नाही तर कोर्टात दाद मागण्याचा इशारा गुंतवणूकदारांनी दिला आहे.

ए.एस. ट्रेडर्सकडून गडहिंग्लज परिसरातील सुमारे साडेतीन हजार गुंतवणूकदारांची दीडशे कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे. - विश्वजीत जाधव, ए.एस. ट्रेडर्सविरोधी कृती समिती

Web Title: A.S. traders 36 crores extortion from in Gadhinglaj area, investors have lodged a complaint with the kolhapur Superintendent of Police by post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.