Kolhapur: ए.एस. ट्रेडर्सचा एजंट प्रतापसिंह शेवाळे अटकेत, गुन्ह्यातील सोळावा संशयित जेरबंद
By उद्धव गोडसे | Published: April 1, 2024 03:53 PM2024-04-01T15:53:56+5:302024-04-01T15:54:46+5:30
शेवाळे याच्याकडून ४५ लाखांची गुंतवणूक
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या ए.एस. ट्रेडर्स कंपनीचा एजंट प्रतापसिंह विनायक शेवाळे (वय ५०, रा. बाबू पार्क, बहिरेवाडी, ता. पन्हाळा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बहिरेवाडी येथील घरातून सोमवारी (दि. १) अटक केली. या गुन्ह्यात अटक केलेला हा सोळावा संशयित आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या ए.एस. ट्रेडर्स कंपनीचे संचालक आणि एजंट अशा २८ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्ह्यातील सोळावा संशयित जेरबंद केला. गुन्हा दाखल झाल्यापासून एजंट प्रतापसिंह शेवाळे हा पसार होता.
सध्या तो त्याच्या बहिरेवाडी येथील घरात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जाऊन त्याला अटक केली. त्याने ए.एस. ट्रेडर्स कंपनीत एजंट म्हणून दोन वर्ष काम केले. या कालावधीत ३० गुंतवणूकदारांचे सुमारे ४५ लाख रुपये त्याने कंपनीत विविध योजनांमध्ये जमा केले. यातील काही गुंतवणूकदारांना परतावे मिळाले आहेत. २०१९ मध्ये काम बंद केल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले, अशी माहिती शेवाळे याने पोलिसांना दिली.
नोकरी गेल्यानंतर बनला एजंट
अटकेतील संशयित शेवाळे हा मनुग्राफ कंपनीत काम करीत होता. नोकरी गेल्यानंतर तो ए.एस. ट्रेडर्समध्ये एजंट म्हणून काम करू लागला. कंपनीचा संचालक बाळासो कृष्णात धनगर याच्या सांगण्यावरून त्याने कमिशन एजंट म्हणून काम सुरू केले. याचे काही मित्र आणि नातेवाईकही ए.एस.च्या जाळ्यात अडकले आहेत.