Kolhapur: अटकेची भीती, ए.एस. ट्रेडर्सचे संचालक घरदार सोडून पळाले; सुवर्णा सरनाईककडून महत्त्वाची माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 01:09 PM2023-07-25T13:09:26+5:302023-07-25T13:09:47+5:30
दोन संचालकांच्या घरांवर छापे
कोल्हापूर : ए.एस. ट्रेडर्सकडून झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास नवीन अधिकाऱ्यांनी हाती घेताच गती आली आहे. संशयित संचालिका सुवर्णा श्रीरंग सरनाईक (रा. अंबाई टँक, रंकाळा, कोल्हापूर) हिच्या अटकेनंतर आता अन्य संचालकांचे धाबे दणाणले आहेत. कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता असल्याने संशयित संचालक घरदार सोडून पळाले आहेत. दरम्यान, अटकेतील सरनाईक हिच्याकडून काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ए.एस. ट्रेडर्स कंपनीच्या २७ संचालकांवर गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी पोलिसांनंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी गुन्ह्याचा तपास स्वीकारताच पसार असलेल्या संचालकांच्या अटकेला त्यांनी प्राधान्य दिले आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनीही तपासाचा आढावा घेऊन तपास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त संचालक आणि एजंटना अटक करून त्यांची मालमत्त जप्त करण्याचे आदेश त्यांनी तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे गुन्ह्याचा तपास गतिमान झाल्याचे दिसत आहे.
दोन संचालकांच्या घरांवर छापे
शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अटक टाळण्यासाठी संचालक गाव सोडून पळाले होते. मधल्या काळात तपास थंडावल्याने यातील काही संचालकांचे घरी येणे-जाणे वाढले होते. मात्र, संचालक महिलेस अटक झाल्यानंतर पुन्हा संशयितांची धावपळ सुरू झाली आहे. अटकेतील संशयित सरनाईक हिला सोबत घेऊन पोलिसांनी करवीर तालुक्यातील दोन संचालकांच्या घरांवर छापे टाकले. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच संचालक पळाले होते.
सरनाईक एजंट ते संचालक
अटकेतील संचालिका सुवर्णा सरनाईक ही ए.एस. ट्रेडर्स कंपनीत सुरुवातीला एजंट म्हणून काम करीत होती. तिने शेकडो लोकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक कंपनीला मिळवून दिली. त्यामुळे संचालक पदावर तिची वर्णी लागली. सुरुवातीपासून ती कंपनीत कार्यरत असल्याने तिच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांनी सांगितले.