ए.एस.ट्रेडर्सने गुन्हे दाखल झाल्यानंतरही नव्या कंपन्यांत वळविले पैसे, ५५ बँक खाती गोठवली, दोन कार जप्त
By उद्धव गोडसे | Published: May 6, 2023 12:26 PM2023-05-06T12:26:56+5:302023-05-06T12:27:13+5:30
संचालकांची पार्श्वभूमी फसवेगिरीची, मालमत्ता जप्तीची प्रक्रिया गतिमान
उद्धव गोडसे
कोल्हापूर : ए.एस. ट्रेडर्सच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतरही कंपनीच्या संचालकांनी फसवणूक करणे थांबवले नाही. जानेवारी २०२३ मध्ये नवीन दोन कंपन्या सुरू करून त्याद्वारे गुंतवणूक जमा केली. तसेच कोट्यवधींची रक्कम नवीन कंपन्यांच्या खात्यांमध्ये वळवल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. पोलिसांनी कंपन्यांसह संचालकांची ५५ बँक खाती गोठवली आहेत, तर दोन आलिशान कार जप्त केल्या.
नोव्हेंबर २०२२ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनी बंद होणार नाही. परतावे थांबणार नाहीत, उलट गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे ठासून सांगितले जात होते. त्यासाठी वारंवार ऑनलाइन झूम मिटिंग, सेमिनार्स घेतले जात होते. मात्र, भविष्यातील धोके ओळखून संचालक नवीन चाल खेळले. त्यांनी पैसे वळविण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये नवीन दोन कंपन्या सुरू केल्या. त्या कंपन्यांच्या खात्यांवर मोठ्या रकमा वळविल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. नवीन दोन कंपन्यांसह जुन्या सर्व कंपन्या आणि संचालकांची एकूण ५५ बँक खाती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोठवली.
ए.एस. ट्रेडर्सच्या संचालकांनी गेल्या ४-५ वर्षांत मिळवलेले कोट्यवधी रुपये आलिशान बंगले, महागड्या गाड्या, दागिने, प्लॉट, जमिनी खरेदीत गुंतवले. ती सर्व गुंतवणूक पोलिसांच्या रडारवर आली असून, जप्तीच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. संशयित संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावरील वाहनांची माहिती आरटीओ विभागाकडून मागविण्यात आली.
महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते तलाठ्यांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांकडून संशयितांनी केलेल्या जमीन खरेदीची माहिती मागवली आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी केलेली सर्व मालमत्ता जप्त केली जाणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
महागड्या कार...
श्रीमंती दाखवण्यासाठी ए.एस.च्या संचालकांनी जग्वार, मर्सिडीज, ऑडी, फोर्च्युनर अशा महागड्या कार वापरल्या. खासगी सुरक्षारक्षक घेऊन ते वावरत होते. काही संचालक आणि एजंटनी वाढदिवस, लग्न समारंभासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला. करवीर तालुक्यातील काही भपकेबाज वाढदिवसांच्या सुरस कथा आजही सांगितल्या जातात. सर्व संचालकांच्या महागड्या कार आणि एजंटना दिलेल्याही कार पोलिसांकडून जप्त केल्या जाणार आहेत.
संचालकांचा इतिहास फसवणुकीचाच
ए.एस.च्या अनेक संचालकांचा इतिहास फसवणुकीचा आहे. यापूर्वी साखळी पद्धतीच्या मार्केटिंग स्कीममधून त्यांनी अनेकांना गंडा घातला. काहींनी शेअर मार्केटिंगच्या निमित्ताने लोकांकडून पैसे घेतले. फसवणुकीचा अनुभव पाठीशी असल्यानेच त्यांनी पुन्हा मोठा गंडा घालण्याचे धाडस केल्याचे बोलले जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या पैशांवर मौजमजा करणाऱ्या संचालकांभोवती कारवाईचा फास आवळला आहे. त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे काम सुरू आहे. गुंतवणूकदारांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्यात. - औदुंबर पाटील - तपास अधिकारी, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा