ए.एस. ट्रेडर्सचे पैसे अन्यत्र गुंतवले, प्रमुख लोहितसिंग सुभेदारची कबुली; गुंतवणूकदारांना दिलं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 05:57 PM2022-12-12T17:57:28+5:302022-12-12T17:57:57+5:30

गुंतवणूकदारांचा तगादा टाळण्यासाठीच कंपनीच्या प्रमुखाकडून दिशाभूल सुरू असल्याचा विरोधी कृती समितीचा आरोप

A.S. Traders money invested elsewhere, Confession of Chief Lohit Singh Subedar | ए.एस. ट्रेडर्सचे पैसे अन्यत्र गुंतवले, प्रमुख लोहितसिंग सुभेदारची कबुली; गुंतवणूकदारांना दिलं आश्वासन

ए.एस. ट्रेडर्सचे पैसे अन्यत्र गुंतवले, प्रमुख लोहितसिंग सुभेदारची कबुली; गुंतवणूकदारांना दिलं आश्वासन

googlenewsNext

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीचे संचालक आणि गुंतवणूकदारांची ऑनलाइन बैठक रविवारी (दि. ११) सायंकाळी झाली. या बैठकीत बोलताना कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याने कंपनीचे पैसे ट्रेडिंगशिवाय अन्यत्र गुंतवल्याची कबुली दिली, तसेच यापुढे ट्रेडिंगशिवाय इतर ठिकाणी गुंतवणूक केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

तसेच बंद झालेले परतावे १५ जानेवारीपासून सुरू होतील, असे आश्वासन दिले. दरम्यान, गुंतवणूकदारांचा तगादा टाळण्यासाठीच कंपनीच्या प्रमुखाकडून दिशाभूल सुरू असल्याचा आरोप विरोधी कृती समितीने केला आहे.

ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कंपनीचा प्रमुख लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार हा पहिल्यांदाच रविवारी ऑनलाइन मिटिंगद्वारे गुंतवणूकदारांसमोर आला. कंपनीची भूमिका मांडताना त्याने ट्रेडिंगशिवाय अन्य ठिकाणी पैसे गुंतवल्याची कबुली दिली. यापुढे ट्रेडिंगशिवाय अन्य क्षेत्रात गुंतवणूक केली जाणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. गुंतवणूकदारांचे थांबलेले परतावे १५ जानेवारीनंतर सुरू होतील, असा नवा मुहूर्तही त्याने सांगितला.

कंपनीचे कामकाज सुरू करण्याबद्दल त्याने बैठकीतून ग्रुप लीडर्स आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र कंपनीची कार्यालये नेमकी कधीपासून सुरू करणार, त्याबद्दल काहीच भाष्य केले नाही. एकतर्फी निवेदनात त्याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही सांगितले. कंपनीचा संचालक अमर चौगले यानेही बैठकीत गुंतवणूकदारांशी संवाद साधताना परतावे पुन्हा सुरू होतील, असा विश्वास व्यक्त केला.

विरोधी कृती समितीचा आरोप

कंपनीच्या संचालकांनी ऑनलाइन बैठकीतून विरोधी कृती समितीच्या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित होते. परंतु कंपनी प्रमुखाने सर्व प्रश्नांना बगल दिली. परतावे देण्याच्या नव्या तारखा सांगून दिशाभूल केली आहे. गुंतवणूकदारांचा तगादा थांबविण्यासाठीच हे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधी कृती समितीने केला आहे.

पोलिस तपास थंडच

ई-स्टोअर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होताच २४ तासांच्या आत शाहूपुरी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. ए. एस. ट्रेडर्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल होऊन १७ दिवस उलटले तरी अजून एकाही संचालकाला अटक झालेली नाही, त्यामुळे पोलिसांच्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: A.S. Traders money invested elsewhere, Confession of Chief Lohit Singh Subedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.