Kolhapur- असंडोलीच्या शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू, अपहरण करून खून केल्याची नातेवाईकांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:51 PM2023-09-15T12:51:16+5:302023-09-15T12:51:52+5:30
पीएम रिपोर्टनुसार कारवाई होणार
कोल्हापूर : कोनोलीपैकी असंडोली (ता. राधानगरी) येथील शेतकरी संतोष गणपती गुरव (वय ४४) हे गुरुवारी (दि. १४) सकाळी साडेनऊच्या सुमारास कुडित्रे (ता. करवीर) येथील एका शेतातील घरात गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले. ओळखीतील एका व्यक्तीने गळफास सोडवून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुडित्रे येथील पाच ते सहा जणांनी गुरव यांचे अपहरण करून खून केला असून, आत्महत्येचा बनाव केल्याची तक्रार नातेवाईकांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंद्रजित भीमराव पाटील या व्यक्तीने संतोष गुरव यांना गुरुवारी सकाळी सीपीआरमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर, कुडित्रे येथील शेतातील घरात त्याने गळफास घेतल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली. दरम्यान, गुरव यांच्या नातेवाईकांनी आणि कोनोलीपैकी असंडोली येथील ग्रामस्थांनी राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. गुरव यांची आत्महत्या नाही, तर अपहरण करून त्यांचा खून केल्याचा आरोप त्यांनी निवेदनाद्वारे केला.
संतोष गुरव चार दिवसांपासून बेपत्ता होते. बुधवारी (दि. १३) दुपारी तो घरी आला. त्यानंतर चारच्या सुमारास कुडित्रे येथील पाच ते सहा जणांनी घरात येऊन त्याचे अपहरण केले. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
पीएम रिपोर्टनुसार कारवाई होणार
याबाबत करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांना विचारणा केली असता, शवविच्छेदन अहवालातून सर्व काही स्पष्ट होईल. त्यानंतर दोषींवर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.