कोनोली तर्फ असंडोली रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:52+5:302021-06-02T04:19:52+5:30
म्हासुर्ली-कोनोली या मुख्य मार्गावरील चार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तीन वर्षांपूर्वी अडीच कोटी रुपये मंजूर झाले असून, या रस्त्याचे ...
म्हासुर्ली-कोनोली या मुख्य मार्गावरील चार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तीन वर्षांपूर्वी अडीच कोटी रुपये मंजूर झाले असून, या रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण, खडीकरणासह डांबरीकरणाचे काम कोल्हापुरातील प्रथितयश बांधकाम ठेकेदाराकडून गेल्या तीन वर्षांपासून कूर्म गतीने सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून रुंदीकरण, खडीकरण व मजबुतीकरण झाले असून, कार्पेटिंग व सीलकोटचे काम अपूर्णावस्थेत आहे. ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभाग आणि ठेकेदाराकडे विनंती करून काम पूर्ण करण्याची मागणी केली असता ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कालपासून ठेकेदाराने कार्पेटिंगचे काम सुरू केले असून, रस्त्यावरील धूळ बाजूला न करता, तसेच योग्य जाडी न करता काम सुरू केले असून, अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम सुरू आहे. काल केलेले काम आज उखडून जात असून, हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काम बंद पाडले, तसेच संबंधित कामाची चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून, कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
===== गेल्या तीन वर्षांपासून हे काम अत्यंत मंद गतीने सुरू असून, कामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच आम्ही तक्रारी केल्या होत्या, तसेच काम वेळेत पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांसह ठेकेदारास विनंती केली. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, कालपासून ऐन पावसाच्या तोंडावर कार्पेटिंगचे काम करण्याचे ठेकेदारामार्फत सुरू असून, आम्ही काम बंद पाडले आहे.