‘आशा’ कर्मचाऱ्यांचा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घराजवळ रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 02:13 PM2019-09-10T14:13:37+5:302019-09-10T14:22:14+5:30
मानधनवाढीसह इतर मागण्यांची दखल न घेतल्याने ‘आशा’ कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढलेला मोर्चा मंगळवारी पोलिसांनी संभाजीनगर बसस्थानकाजवळ अडवला.
कोल्हापूर : मानधनवाढीसह इतर मागण्यांची दखल न घेतल्याने ‘आशा’ कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढलेला मोर्चा मंगळवारी पोलिसांनी संभाजीनगर बसस्थानकाजवळ अडवला.
मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी गेले आठ दिवस आशा कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु आहे. या मागण्यांची दखल घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढण्याचा निर्णय घेतला.
संभाजीनगर परिसरात सकाळी ११ नंतर या सर्व महिला हळूहळू जमल्या. याठिकाणी प्रचंड प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. सुमारे तासभर या सर्वांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्या पालकमंत्र्यांच्या घराकडे निघाल्या, तेव्हा बसस्थानकाजवळ पोलिसांनी हा मोर्चा रोखला.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर याप्रश्नी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि बुधवारी दुपारपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केल्यानंतर हा मोर्चा विसर्जित करण्यात आला.
प्रारंभी चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम यांनी आशा व गटप्रवर्तकांना मार्गदर्शन केले. या आंदोलनाचे नेतृत्व नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, सुप्रिया गुदले, सारिका पाटील, मनीषा पाटील, स्मिता कुलकर्णी, वसुधा बुडके यांच्यासह अन्य महिलांनी केले. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे मेहबूब शेख, वकील संघटनेच्या अॅड. नीता मगदूम, शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. भगवान पाटील यांच्यासह विविध तालुक्यांतील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.