आशांना कार्यमुक्तीचे दिलेले पत्र रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:39+5:302020-12-08T04:20:39+5:30

कोल्हापूर : आशा वर्कर्सनी जर क्षयरोग आणि कुष्ठरुग्ण सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला नाही, तर त्यांना कार्यमुक्त करण्याचा इशारा देणारे पत्र ...

Asha's dismissal letter canceled | आशांना कार्यमुक्तीचे दिलेले पत्र रद्द

आशांना कार्यमुक्तीचे दिलेले पत्र रद्द

Next

कोल्हापूर : आशा वर्कर्सनी जर क्षयरोग आणि कुष्ठरुग्ण सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला नाही, तर त्यांना कार्यमुक्त करण्याचा इशारा देणारे पत्र रद्द करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन यांच्यावतीने हे पत्र रद्द करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर दोन तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी घोषणा देत हा परिसर दणाणून सोडण्यात आला.

राज्यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, आधीचेच मानधन मिळालेले नसल्याने या सर्वेक्षणावर आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांनी बहिष्कार घातला होता. जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याची घोषणाही केली होती.

-----------------------------------------------

सांगलीत जुगार अड्ड्यावर छापा; १३ जणांना अटक

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करताना शहरातील तीनपानी जुगारअड्डा उद्ध्वस्त केला. रमामातानगर येथील आलिशान चौकात हा अड्डा सुरू होता. यावेळी १३ जणांना अटक करत २६ हजार ३०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

-----------------------------------------------

मिरजेत ४५० रुपये उधारीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

मिरज (जि. सांगली) : मिरजेत रेल्वे कमर्चारी वसाहतीजवळ समतानगर येथे गोविंदा व्यंकटेश मुत्तीकोळ (वय ४०) या तरुणाचा साडेचारशे रुपये उधारी देण्याच्या वादातून दोघा मित्रांनीच डोक्यात दगड घालून आणि गळा चिरून खून केला. रविवारी मध्यरात्री गोविंदा मुत्तीकोळ याच्या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी केवळ दोन तासांत दोघा संशयितांना अटक केली. शक्ती मधुकर खाडे (३१) व मिलिंद घन:श्याम सादरे (५२, रा. माणिकनगर मिरज) अशी संशयितांची नावे आहेत.

-----------------------------------------------

वाहून जाणाऱ्या पाण्याचे ऑडिट करावे

आदर्की (जि. सातारा) : फलटण-खंडाळा तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या धोम-बलकवडी कालव्यात वर्षाकाठी दोन आवतर्ने सोडून लाखो रुपये पाणीपट्टी वसूल केली जाते; पण पावसाळ्यात डोंगरातून वाहून येणारे नैसर्गिक पाणी सहा महिने वाहते. त्यामुळे ओढे कोरडे पडत असल्याने वाहून जाणाऱ्या पाण्याचे ऑडिट करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

-----------------------------------------------

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

फलटण (जि. सातारा) : फलटण-बारामती रस्त्यावर अलगुडेवाडी हद्दीत दुचाकीस आज्ञात वाहनाने ठोकरल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शिवाजी रामचंद्र गोरे (वय ६२, रा. सुरवडी, ता. फलटण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शिवाजी गोरे हे फलटण-बारामती रस्त्यावरील हेरिटेज दूध प्रकल्पामध्ये चालक म्हणून कामाला होते.

-----------------------------------------------

रत्नागिरी जिल्ह्यात ६०.१७ टक्के वीज बिलाची वसुली

रत्नागिरी : लॉकडाऊनपासून अनेक ग्राहकांनी वीज बिले वेळेवर न भरल्याने थकबाकी वाढली होती. परंतु महावितरणकडून ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन केल्यानंतर ग्राहकांकडूनही त्यासाठी आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्ह्यातील ३३ हजार २४० ग्राहकांनी वीज बिलाचे ३६ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये भरल्याने वसुलीचे प्रमाण ६०.१२ टक्क्यांवर आले आहे.

-----------------------------------------------

सव्वादोन लाखांचा अपहार, दोघांवर गुन्हा

रत्नागिरी : पावस येथे खरेदी-विक्री केंद्रामध्ये २ लाख ३४ हजार ५२० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २ फेब्रुवारी २०२० ते १२ जुलै २०२० या कालावधीत घडला. किरण कमलाकर पावसकर आणि आर्यन किरण पावसकर (बौद्धवाडी, पावस, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

-----------------------------------------------

बांद्यात २३ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त; लातूर येथील दोघांना अटक

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : बांदा सटमठवाडी टोलनाका येथे गोव्याहून लातूरकडे ट्रकमधून नेण्यात येणारा २३ लाख ६७२ रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. ट्रकसह ३४ लाख १० हजार ६७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गोपाळ वाघबळ ढोमसे (३२, रा. वाजरखेडा, ता. हलकी, जि. लातूर) व सतीश नामदेव कांबळे (२४, रा. येरगी, ता. देगलूर, जि. नांदेड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

-----------------------------------------------

Web Title: Asha's dismissal letter canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.